नागपूर : भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतले. त्याबाबतची माहिती दोन महिला अधिकाऱ्यांनी देशाला दिली आणि सशस्त्र दलातील नारीशक्तीची देशभर चर्चा होऊ लागली. हवाई दलातील नारीशक्तीमध्ये नागपूरचेही योगदान आहे. नागपूरच्या अंतरा मेहता या भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी आहेत.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात २६ पर्यटकांना ठार केले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतले आहे. यामध्ये सर्वांत महत्वाची भूमिका भारतीय हवाई दलाची आहे. गुप्तचर खात्याच्या माहितीच्या आधारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्धवस्त करण्यात आले. या कारवाईची माहिती देण्यासाठी दोन महिला अधिकारी माध्यमांसमोर आल्या. भारतीय लष्कराने पाकिस्तानला संदेश देण्यासाठी अगदी ठरवून या अधिकाऱ्यांची निवड केल्याचे लष्करातील निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भारतीय सशस्त्र सेनेतील नारीशक्ती किती प्रभावी आहे, हे यातून दाखवून द्यायचे आहे. सशस्त्र दलातील नारीशक्तीमध्ये नागपूरचा देखील मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील पहिल्या लढाऊ वैमानिक अंतरा मेहता आहेत. त्या २०२० मध्ये हवाई दलात सहभागी झाल्या.
त्यावेळी फायटर स्ट्रीमसाठी निवड झालेल्या अंतरा या आपल्या बॅचमधील एकमेव महिला अधिकारी होत्या. अंतरा मेहता यांचे प्राथमिक शिक्षण माऊंट कार्मेल गर्ल्स स्कूलमध्ये झाले. अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधून पूर्ण केले. नागपूरच्या अंतरा मेहता या भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी आहेत.याशिवाय सिद्धी हेमंत दुबे या नागपूरकर महिला नौदलात वैमानिक आहेत. त्या २०२३ मध्ये नौदलात सहभागी झाल्या. सिद्धी दुबे यांचे शिक्षण नागपूरच्या रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात झाले.