सौंदर्य हा स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय. चित्रपट किंवा मालिकांमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रींच्या शरीरयष्टीने युवतींना चांगलीच भुरळ घातल्याचे दिसते. त्यामुळेच आपले दिसणे हे इतरांपेक्षा वेगळे असावे, अशी इच्छा तरुणी आणि महिला मनी बाळगून असतात. यातूनच आता नोकरी करणाऱ्या महिला तसेच गृहिणींनीही व्यायामावर लक्ष केंद्रित केल्याने खासगी व्यायामशाळांमध्ये त्यांची संख्या वाढताना दिसत आहेत.

वाढत्या शहरीकरणाचा परिणाम हा माणसाच्या दैनंदिन सवयी आणि राहणीमानावर झाला. निरोगी शरीरासाठी व्यायाम करणे चांगलेच. मात्र, हल्ली केवळ निरोगी राहण्यासाठी नव्हे तर चांगल्या शरीरयष्टीसाठीही जीममध्ये जाण्याचा कल वाढला आहे. सुरुवातीच्या काळात केवळ तरुणांचीच गर्दी जीममध्ये होत असे. त्यातही दणकट शरीरसंपदा कमावणे हा त्यांचा मूळ हेतू असायचा. मात्र, ही जागा आता युवती आणि गृहिणींनीही घेतली आहे. परिणामी, शहरांत पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही स्वतंत्र व्यायामशाळा सुरू झाल्या आहेत. वजन वाढणे आणि लठ्ठपणावर मात करण्यासाठी व्यायाम हा एक उपाय मानला जात असल्याने तरुणींबरोबरच नोकरदार महिला व गृहिणी सुद्धा वेळात वेळ काढून जीममध्ये जात आहेत.

‘स्मार्ट बट स्लिम’ हा खास करून तरुणींमध्ये रुजलेला ट्रेंड महिला वर्गांनीही आत्मसात केला आहे. यात नोकरी करणाऱ्या महिलांसोबत आता गृहिणीही मागे नाहीत. शारीरिक तंदुरुस्तीसाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून ३० ते ३५ वयोगटातील महिलांचे व्यायामशाळांमध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

सोयीनुसार वेळ –

व्यायामशाळांमध्ये जाणाऱ्या महिलांचा कल बघता शहरात अनेक नवे जीम सुरू होत आहेत. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी तसेच गृहिणींसाठी त्यांच्या सोयीनुसार वेळ ठरवली जाते. महाविद्यालयीन तरुणी या विशेषत: सकाळी जीममध्ये येण्याला प्राधान्य देतात, असे रामदासपेठ मधील महिला हेल्थ क्लबच्या प्रमुख कीर्ती बोरीकर यांनी सांगितले.

अत्याधुनिक सुविधा व प्रशिक्षक –

जीम तसेच हेल्थ क्लबची संख्या शहरात वाढत आहे. त्यांचा दर्जा तेथील अत्याधुनिक सुविधा व उपकरणांवर ठरतो. ‘क्रॉसफिट’, योगासने, झुंबा, ‘किक बॉक्सिंग’, ‘स्पिनिंग’, ‘एरोबिक्स’ अशा विविध व्यायाम प्रकारांकडे महिलावर्ग आकर्षित होत आहेत.

दररोज किमान एक तास तरी द्यायला हवा –

“घरकाम आणि नोकरी-व्यवसायात व्यग्र महिलांना व्यायामासाठी वेळ देणे कठीण असते. मात्र, दररोज किमान एक तास तरी यासाठी द्यायला हवा. शरीर तंदुरुस्त असल्याचे फायदे कामात दिसतात, त्यामुळे मनही प्रसन्न राहते.” असं आयटी क्षेत्रात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या कांचन जोगी यांन म्हटलं आहे.