नागपूर: पूर्वी जुगाराचे अड्डे लपून-छपून चालायचे. आज तोच जुगार ‘गेम’च्या गोंडस नावाखाली प्रत्येकाच्या खिशात पोहोचला आहे. गल्लीबोळात आणि घराघरांत मनोरंजनाचे साधन झालेला ‘लुडो’ आता थेट जुगाराच्या अड्ड्यावर पोहोचला आहे. यशोधरानगर परिसरातील वनदेवी नगर चौकात रस्त्याच्या कडेला बसून मोबाईलवर अशाच ‘लुडो किंग’ गेम मधून जुगार लावणाऱ्या ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वरकरणी ही साधी पोलीस कारवाई वाटत असली, तर यामागे कुटुंबांचे उद्ध्वस्त होणारे भविष्य आणि ‘डिजिटल’ जुगाराच्या जाळ्यात अडकलेल्या पिढ्यांची कहाणी चव्हाट्यावर आली आहे.

नेमके काय घडले वनदेवी नगर चौकात

३१ जुलैच्या रात्री सव्वा आठच्या सुमारास यशोधरानगर पोलिसांचे पथक गस्तीवर होते. वनदेवी नगर चौकाजवळ काही जण एकाच भ्रमणध्वनीवर टक लावून काही तरी करत असल्याचे पोलिसांना दिसले. जवळ जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता, मोबाईलच्या स्क्रीनवर सुरू असलेला लुडो गेम पोलिसांना दिसला. तो केवळ फासे टाकण्याचा नव्हता, तर त्यावर कष्टाचा पैसा लावलेला होता. पोलिसांना यावेळी २६ ते ५४ वयोगटातील ७ जण जुगार खेळत असल्याचे आढळले.

मोबाईलच्या आड ‘डिजिटल’ जुगार

पूर्वी पत्त्यांच्या क्लबवर किंवा मटका अड्ड्यावर होणारा जुगार आता ५ इंचाच्या भ्रमणध्वनी स्क्रीनवर सहज उपलब्ध झाला आहे. हा खेळ केवळ मनोरंजनासाठी आहे असे भासवून लोक याच्या आहारी जात आहेत. पोलिसांनी शुक्रवारी पकडलेल्या आरोपींमध्ये २४ वर्षांच्या तरुणापासून ते ५४ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंतच्या नागरिकांचा समावेश आहे. “सुरुवातीला वेळ घालवण्याचे साधन म्हणून सुरू झालेला हा खेळ हळूहळू पैशांच्या बाजीवर येतो आणि पाहता पाहता माणूस कर्जाच्या आणि गुन्हेगारीच्या गर्तेत ढकलला जातो,” असे पोलिसांचे म्हणणे आहे.

‘शॉर्टकट’मुळे कुटुंबाचे भवितव्य धोक्यात

पोलिसांनी ‘महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्या’न्वये अब्दुल कलाम अब्दुल करीम (४४) शेख अष्पाक शेख गफुर (५४) शेख अकरम शेख उस्मान (४४), शेख मोहसिन शेख ख्वाजा (३६) , शेख अयुब शेख गफ्फार कुरेशी (३७) , मोहम्मद शाहीद आलम मोहम्मद ईस्तीयाक आलम (४४), करीम शहा सलाम शहा (२६) या सात जणांवर गुन्हे दाखल केले. या एका चुकीमुळे त्यांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यशोधरानगर पोलिसांनी तत्परता दाखवून ही कारवाई केली असली, तरी मोबाईल गेमिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगाराला रोखण्याचे आव्हान आता समाजासमोर उभे ठाकले आहे.

स्क्रीनच्या आड लपलेला ‘अदृश्य शत्रू’

मुलांच्या हातात शिक्षणासाठी दिला जाणारा मोबाईल जर घरातील कर्त्या पुरुषालाच जुगाराच्या गर्तेत लोटत असेल, तर हा प्रश्न केवळ कायद्याचा उरत नाही, तो एका संपूर्ण समाजाच्या मानसिकतेचा बनतो. यशोधरानगर पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कर्तव्य बजावले आहे. पण आता खरी परीक्षा आहे ती समाजाची. आपल्याच घरातील माणूस अशा ‘डिजिटल’ जाळ्यात अडकत तर नाही ना, हे वेळीच ओळखण्याची गरज यातून व्यक्त होत आहे.