नागपूर : राज्यस्तरीय १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्यानंतरही अंडर -१९ च्या संघात निवड होत नसल्याने तणावाखाली आलेल्या महिला क्रिकेटपटूने गळफास लावून आत्महत्या केली. बजाजनगर पोलीस हद्दीतील लक्ष्मी नगरातल्या जैन मंदिराशेजारी गुरुवारी पहाटे साडेपाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आदिती मोरेश्वर चौखंडे (१७) असे गळफास लावून मृत्यूला कवटाळणाऱ्या उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूचे नाव आहे.

मूळची अकोला शहरातील असलेली आदिती ही अंडर-१५ क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भ संघाकडून खेळली होती. अकोल्यात क्रिकेटचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ती नागपुरातील क्रिकेट अकादमीत प्रशिक्षणासाठी आली होती. तिचा भाऊ प्रज्वल हा सुद्धा क्रिकेटपटू असून तो वडिलांसह अकोला येथे राहतो. आदिती ही आईसह लक्ष्मीनगर चौकात उमालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या माळ्यावर राहत होती. आदितीला आपणही क्रिकेटपटू व्हावे, अशी उच्छा होती. ती वेगवेगळ्या ठिकाणी सराव करायला जात होती.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार शहरातील सुर्वे क्रिकेट अकादमीमध्ये ती प्रशिक्षण घेत होती. अलीकडेच झालेल्या व्हिसीएच्या निवड चाचण्यांमध्ये तिची निवड न झाल्यामुळे ती प्रचंड निराश आणि मानसिक तणावाखाली होती, घटनास्थळी मिळालेल्या हस्तलिखित चिठ्ठीत ‘माझी निवड झाली नाही’ असा उल्लेख असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, शक्य त्या सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहे.