नागपूर: खामला येथील एका साध्या शाळेतील वर्गातून थेट लंडनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित स्टार्टअप सुरू करण्यापर्यंतचा प्रवास करणाऱ्या कौस्तुभ रामेकर या नागपूरच्या तरुण उद्योजकाने जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ब्रिटनमध्ये स्थापन केलेल्या त्याच्या ‘फ्लेक्सीवर्क एआय लिमिटेड’ या कंपनीमार्फत लवचिक आणि ‘झिरो-आवर’ रोजगार व्यवस्थेत न्याय्यपणा आणि कार्यक्षमता आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. कौस्तुभ यांनी खामला येथील सोमलवार हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नागपूर व पुण्यातील विविध स्टार्टअप्ससोबत काम करत त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली.

पुढे त्यांनी ब्रिटेनमध्ये उच्च शिक्षण घेत युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटर येथून २०२०-२१ या कालावधीत बिझनेस अ‍ॅनालिटिक्समध्ये एमएससी पदवी मिळवली. शिक्षणानंतर त्यांनी लंडनमध्ये अ‍ॅमेझॉनसह इतर कंपन्यांमध्ये काम केले. या उद्योगविश्वातील अनुभवामुळे त्यांच्या उद्योजकीय विचारांना दिशा मिळाली. सप्टेंबर २०२५ मध्ये कौस्तुभ यांनी सहसंस्थापक इमामुद्दीन शेख यांच्यासह लंडनमध्ये ‘फ्लेक्सीवर्क एआय लिमिटेड’ची स्थापना केली. सध्या कौस्तुभ दक्षिण लंडनमधील क्रॉयडन येथे वास्तव्यास असले तरी नागपूरशी त्यांचे नाते आजही घट्ट आहे. खामल्यातील पांडे लेआउटमध्ये त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे.

स्टार्टअप काय आहे?

‘फ्लेक्सीवर्क एआय’ ही एआय-सक्षम शिफ्ट व मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणाली विकसित करत आहे. आरोग्यसेवा, हॉस्पिटॅलिटी आणि सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांतील लवचिक व शिफ्ट-आधारित रोजगार अधिक आधुनिक पद्धतीने हाताळण्याचा कंपनीचा उद्देश आहे. ही प्रणाली टेलिफोनीसोबत एकत्रित एआयचा वापर करून शिफ्टची पुष्टी, शेवटच्या क्षणी निर्माण होणाऱ्या मनुष्यबळाच्या कमतरतेची भरपाई आणि संवादाची संरचित नोंद ठेवते. या प्लॅटफॉर्ममधील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘फेअरनेस इंजिन’. याच्या माध्यमातून कामाच्या संधी कामगारांमध्ये अधिक समतोलपणे वाटल्या जातात, पक्षपात आणि शिफारसींवर आधारित निर्णय कमी होतात.

प्रत्येक शिफ्टची ऑफर, स्वीकार किंवा नकार यांची नोंद स्वतंत्र लेजरमध्ये ठेवली जाते, ज्यामुळे नियोक्ते आणि नियामकांसाठी पारदर्शक व तपासणीयोग्य माहिती उपलब्ध होते. ब्रिटेनमध्ये झिरो-आवर आणि एजन्सी कामगारांच्या हक्कांना बळकटी देणाऱ्या नव्या रोजगार नियमांच्या पार्श्वभूमीवर ‘फ्लेक्सीवर्क एआय’चे कार्य विशेष महत्त्वाचे ठरत आहे. यामध्ये ठरावीक कामाचे तास, तसेच रद्द झालेल्या शिफ्टसाठी मोबदला यांसारख्या बाबींचा समावेश आहे. मनुष्यबळ व्यवस्थापनापलीकडे जाऊन कंपनी दीर्घकालीन दृष्टीकोनातून शाश्वततेवरही भर देत आहे. भविष्यातील आवृत्त्यांमध्ये प्रेडिक्टिव्ह अ‍ॅनालिटिक्सचा वापर करून अनावश्यक प्रवास कमी करणे, अतिरिक्त मनुष्यबळ टाळणे आणि संसाधनांचा अधिक परिणामकारक वापर करणे अपेक्षित आहे. यामुळे श्रम कार्यक्षमता वाढण्यासोबतच पर्यावरणीय जबाबदारीही जपली जाणार आहे.