पावसाळ्यातील निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील कुकडीखापा येथील धबधब्यावर गेलेल्या नागपूरच्या चार तरुणांवर अचानक संकट ओढावले. धबधब्या परिसरात पाण्याचा वेग अचानक वाढल्याने चारही तरुण खडकावर अडकून पडले. प्रसंगावधान राखत त्यांनी मदतीची प्रतिक्षा केली. घटनेची माहिती मिळताच राज्य आपत्ती निवारण दलाने घटनास्थळी धाव घेत १५० फूट खोल दरीत उतरून चारही तरुणांची सुखरुप सुटका केली. या थरारक बचावकार्याची ध्वनीफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे.
श्याम बोरकर (२५), अथर्व डोके (२२), मनीष उइके (२५) आणि सतीश बावने (२३) अशी या नागपुरातील चार तरुणांची नावे आहेत. हे चौघेही रविवारी कुकडीखापा धबधबा पाहण्यासाठी गेले होते. ते मध्यभागातील एका खडकावर उभे असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. डोंगर माथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा वेग वाढला. त्यामुळे धबधब्यातील पाणी विसर्गही वाढला.
व्हिडीओ व्हायरल झाल्याने बचाव पथक सतर्क
धबधब्या जवळ तरुण अडकल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाला. त्याची माहिती मिळताच उमरानाला पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी आपत्ती निवारण पथकाला सुचना केली. पथक पाचारण होताच बचाव कार्याला सुरवात झाली. वेगाने वाहणारे पाणी आणि खोल दरीमुळे बचावकार्यात आव्हान होते. पथकाचे जवान दोरीच्या साहाय्याने दरीत उतरून तरुणांपर्यंत पोहोचले. त्यांच्या सुरक्षेसाठी जीवनरक्षक कोट वापर करण्यात आला. त्यानंतर एक-एक करून चारही तरुणांना सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले.
दीड तासांच्या मोहिमेनंतर चौघेही सुखरूप…
एसडीआरएफचे गणेश कुमार धुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरानाला पोलीस चौकीकडून दुपारी सुमारे २ वाजता घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर परिस्थिती लक्षात घेत पथक आवश्यक बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचायला पथकाला जवळजवळ तासाभर लागला. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र दरी खोल असल्यान प्रत्यक्ष बचावकार्यात अडथळे होते. त्यानंतर दोरीच्या सहाह्याने जवानांना खाली उतरवण्यात आले. दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चारही तरुणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
