नागपूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक म्हणजे इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक म्हणजे इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकरिता नागपूर जिल्हा परिषदेने ‘एक तास शिष्यवृत्तीसाठी’ हा उपक्रम राबविला. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला. मागील पाच वर्षात ५ वीच्या परीक्षेत तब्बल १९७७ शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. तर ८ वी च्या परीक्षेत ३५० विद्यार्थी पात्र ठरले. जिल्हा परिषदेने २०२१ पासून सुरू केलेला ‘एक तास शिष्यवृत्तीसाठी’ हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांसाठी फलदायी ठरत असून शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्रता आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जागरूकता
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे आणि शिष्यवृत्ती परीक्षेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेने हा उपक्रम सुरू केला. या अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज एक तास शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेतली जाते. तसेच जिल्हा परिषद सेस निधीतून विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्काची तरतूद करण्यात आली असून जिल्हास्तरावर ओएमआर उत्तरपत्रिकेवर सराव परीक्षांचे आयोजनही करण्यात आले.
लक्षणीय वाढ
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नीलेश गुंड यांनी सांगितले की, २०२१ च्या निकालाच्या तुलनेत यंदाच्या निकालात इयत्ता पाचवीतील पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून इयत्ता आठवीतील निकालात तब्बल दहापट वाढ नोंदविण्यात आली आहे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ झाली असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रभावी ठरत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शिष्यवृत्ती परीक्षेचे वातावरण निर्माण करण्यात आले. राज्यस्तरीय परीक्षेपूर्वी जिल्हा परिषद शाळांमध्ये सराव परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि मुख्य परीक्षेत त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
आता ४ थी व ७ वी साठी परीक्षा
शासनाच्या नव्या निर्णयानुसार २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवीतील विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. त्यामुळे ‘एक तास शिष्यवृत्तीसाठी’ हा उपक्रम यापुढेही सर्व जिल्हा परिषद शाळांनी प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी नीलेश गुंड आणि उपशिक्षणाधिकारी निखिल भुयार यांनी केले आहे.
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा (वर्षनिहाय)
वर्ष परीक्षेकरीता उपस्थित पात्र विद्यार्थी पात्रतेची टक्केवारी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
२०२२ ६६५२ १३५४ २०.३५ ३९७
२०२३ ५९७५ १४०८ २३.५६ ४०६
२०२४ ५१८५ १४१० २७.१९ ३९५
२०२५ ६६०१ १४५३ २२.०१ ४३६
२०२६ ७७५६ १४२२ १८.३३ ३४४
इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा (वर्षनिहाय)
वर्ष परीक्षेकरीता उपस्थित पात्र विद्यार्थी पात्रतेची टक्केवारी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
२०२१ १००१ ९ ०.९० ८
२०२२ १६०० ३१ १.९४ २९
२०२३ १५७६ ९७ ६.१५ ८८
२०२४ १४२० ५४ ३.८० ५०
२०२५ १४१५ ६८ ४.८१ ५८
२०२६ १२८६ १४४ ११.२० ११७
