नागपूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे. निवृत्तिवेतनधारकांना दर महिन्याच्या १ किंवा २ तारखेलाच त्यांच्या खात्यात निवृत्तिवेतनाची रक्कम जमा होईल, अशी व्यवस्था जिल्हा परिषदेने विकसित केलेल्या ऑनलाइन प्रणालीमुळे शक्य होणार आहे. ही प्रणाली विकसित करणारी जिल्हा परिषद राज्यातील पहिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सामान्य प्रशासन विभागाबरोबरच शिक्षण विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे. यापूर्वी निवृत्तिवेतनधारकांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी निश्चित कालावधी नव्हता. त्यामुळे सुट्टी अथवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे अनेकदा विलंब होत असे.

निवृत्तिवेतनधारकांची माहिती गटविकास अधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषदेकडे आल्यानंतर ती सामान्य प्रशासन विभागामार्फत वित्त विभागाकडे पाठविली जात असे. त्यानंतर वित्त विभागातून कोषागार विभागाकडे फाइल पाठविली जात होती. कोषागाराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फाइल पुन्हा संबंधित स्तरावर पाठविली जात असे आणि त्यानंतर निवृत्तिवेतनधारकांच्या खात्यात रक्कम जमा होत होती. या संपूर्ण प्रक्रियेत फाइलचा अतिरिक्त प्रवास होत असल्याने वेळ लागत होता.

नव्या ऑनलाइन प्रणालीमुळे ही प्रक्रिया कमी करण्यात आली आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडून आलेली माहिती सामान्य प्रशासन विभागामार्फत वित्त विभागाकडे जाईल. वित्त विभागाकडून कोषागाराकडे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रक्कम थेट निवृत्तिवेतनधारकांच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे फाइलच्या प्रवासातील एक टप्पा कमी झाला असून वेळेची बचत होणार आहे.

मुख्य वित्त व लेखा अधिकारी म्हणाल्या..

जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी कुमुदिनी श्रीखंडे यांना सांगितले की, ‘नवीन प्रणालीमुळे निवृत्तिवेतन देण्याच्या प्रक्रियेतील एक प्रवास कमी झाला आहे. त्यामुळे आता निवृत्तिवेतन महिन्याच्या १ किंवा २ तारखेलाच जमा होईल.’

निवृत्त शिक्षकांचे वेतनेही जमा होणार

पहिल्या टप्प्यात सामान्य प्रशासन विभागाशी संबंधिक निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित ४,०४६ कर्मचारी असून त्यांना १० कोटी ४३ लाख ७४ हजारांचे रक्कम देण्यात येते. ही रक्कम आता एक क्लिकवर खात्यात जमा होणार आहे. शिक्षण विभागाशी संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे सांगण्यात येते.