नागपूर : शिक्षक विभाग विविध कारणामुळे चर्चेत असतो. शिक्षण विभागाचा शालार्थ आयडी घोटाळा राज्यभर गाजत आहे. विशेष म्हणजे या घोटाळा नागपुरातून समोर आला. या प्रकरणी आतापर्यंत नागपुरात २० वर अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शाळा संचालकांना अटक करण्यात आली आहे. आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत कथित अनियमितता समोर आली आहे. एका शिक्षिकेला अतिरिक्त ठरवताना संबंधित शैक्षणिक वर्षाऐवजी पुढील वर्षाची (२०२६-२७) संचमान्यता गृहीत धरल्याचे आदेशातून दिसून येत आहे. विशेष म्हणजे, त्यानंतर या शिक्षिकेचे वर्धमाननगर येथील घराजवळील शाळेत समायोजन करण्यात आले. त्यामुळे या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

शिक्षकांना अतिरिक्त ठरविताना संबंधित शैक्षणिक वर्षातील संचमान्यतेचा आधार घेतला जातो. त्यानुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे अन्य शाळांमध्ये समायोजन केले जाते. मात्र, संबंधित शिक्षिकेच्या समायोजन आदेशात २०२६-२७ या पुढील शैक्षणिक वर्षाची संचमान्यता नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षाची संचमान्यता गृहीत धरून शिक्षिकेला अतिरिक्त ठरविण्याचा निर्णय कोणत्या निकषांवर घेण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, संबंधित शिक्षिकेला वर्धमाननगर परिसरातील घराजवळील शाळेतच समायोजन मिळाल्याने या प्रकरणाची चर्चा शिक्षण विभागात सुरू झाली आहे. घराजवळील शाळेत समायोजन मिळावे यासाठीच तिला अतिरिक्त ठरविण्यात आले का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. तसेच, इतर शिक्षकांच्या समायोजनाच्या वेळीही पुढील वर्षाची संचमान्यता गृहीत धरण्यात आली आहे का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या नियुक्ती, मान्यता आणि समायोजन प्रक्रियेतील कथित अनियमिततेचे मुद्दे यापूर्वीही समोर आले आहेत. मान्यता नसतानाही शालार्थ आयडी तयार करून वेतन दिल्याच्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले असून, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि संस्थाचालकांसह २० हून अधिक जणांना अटक झाल्याचे प्रकरण चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर समायोजनातील या प्रकाराचीही सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

आदेशात सुधारणा करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना

आदेशात २०२६-२७ ची संचमान्यता नमूद झाली आहे. ती चुकीने झाली असून, आदेशात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नीलेश गुंड यांनी सांगितले.