रेल्वे अर्थसंकल्पाकडून नागपूरकरांच्या अपेक्षा
रेल्वेचा अर्थसंकल्प सादर होण्यास काही दिवस असताना नागपूरकरांसाठी काय असेल याविषयी चर्चा सुरू झाली असून प्रवाशांनी या अर्थसंकल्पातून बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे येत्या २५ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नवीन गाडय़ा आणि रेल्वेतील सोयी-सुविधांबद्दलची मोठी आशा बाळगण्यात येत असून यासाठी मोठय़ा गुंतवणुकीची आवश्यकता आहे, परंतु काही प्रवाशांनी रेल्वेवर फारसा आर्थिक बोझा न पडताही नागपुरातील प्रवाशांना दिलासा दिला जाऊ शकतो, अशा काही उपाययोजना शहरातील जागरूक प्रवाशांनी सुचवल्या आहेत.
शहराचा आकार आणि रेल्वेस्थानकांची संख्या बघता मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरील भार कमी करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मध्यवर्ती रेल्वेस्थानक असल्याने नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. या भागात होणारी वाहतुकीची कोंडी बघता या रेल्वेस्थानकावर प्रवेश करताना आणि तेथून बाहेर पडताना फारच त्रास सहन करावा लागतो. नागपुरातून सर्वाधिक प्रवासी पुणे, मुंबई मार्गावर प्रवास करतात. अजनी रेल्वेस्थानकावर अधिकाधिक गाडय़ांचे थांबे देऊन ही समस्या बऱ्यापैकी कमी केली जाऊ शकते.
मुंबईहून नागपूरला येणाऱ्या ज्या गाडय़ांना अजनी येथे थांबा आहे, या गाडय़ातील जवळपास ४८ टक्के प्रवासी अजनीला उतरतात, तर दक्षिणेकडून येणाऱ्या गाडय़ातील २६ टक्के प्रवासी अजनीला उतरणे पसंत करतात, असे त्यांच्या पाहणीतून आढळून आले आहे. त्यामुळे दूरान्तोसह इतर गाडय़ांना अजनीला थांबा दिल्यास मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरील गर्दी कमी करता येणे शक्य आहे. शिवाय प्रवाशांना देखील वाहतूक कोंडीतून बाहेर पडल्याचा दिलासा मिळेल.
मध्य रेल्वेच्या तत्कालीन विभागीय व्यवस्थापकांनी नागपूर रेल्वेस्थानकावरून ‘प्री-पेड’ ऑटोरिक्षा सुविधा सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे अजनी रेल्वेस्थानकावर देखील अशी सुविधा झाल्यास प्रवाशांची सोय आणि लूटही थांबेल. लांबचा प्रवास करताना झोपेतील प्रवाशांना पुढला थांबा कोणता याची माहिती यंत्रणा अजूनही अनेक गाडय़ांमध्ये नाही. त्यामुळे फलाटावर गाडी थांबवल्यावर झोपलेल्या प्रवाशांची तारांबळ उडते आणि घाईगडबडीत गाडीतून उतरणे शक्य होत नाही. तसा प्रयत्न झाल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक असते.
यामुळे प्रत्येक डब्यात इलेट्रॉनिक पडदा लावून सातत्याने रेल्वेस्थानक, किलोमीटर आणि वेळ दाखवण्यात यावी. यामुळे इतर प्रवाशांना त्रासही होणार नाही आणि संबंधित प्रवाशाला त्याला उतरावयाच्या स्थानकाची माहिती मिळेल, असे वाहतूक अभ्यासक सुधीर वैद्य म्हणाले.
रेल्वेचे सध्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर लक्ष केंद्रित झाले आहे. तेथे स्वच्छता आणि इतर सुविधा वाढवण्यात आली आहे, परंतु अजनी रेल्वेस्थानकावर अस्वच्छता असून असह्य़ दरुगधी आहे. त्याचा बंदोबस्त करण्यात यायला हवा.
तात्काळ तिकीट विक्रीला १० वाजता सुरुवात होते. पुण्याचे तात्काळ तिकीट ऑनलाईन बुकिंग करताना ‘बुक नाऊ’चा पर्याय साडेदहा ते पावणेअकरापर्यंत उपलब्ध होत नाही आणि जेव्हा हा पर्याय संगणकाच्या पडद्यावर येईस्तोवर सर्व तिकिटांची विक्री झालेली असते. हा अनुभव एकदा नव्हे अनेकदा आला आहे. परंतु हेच तिकीट दलालाकडून किंवा अन्य महानगरातून खरेदी केल्यास उपलब्ध होते. या प्रकाराची चौकशी करून रेल्वेने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे, असे वैद्य यांचे सहकारी मधुकर लोहे म्हणाले.

रेल्वेकडून अपेक्षा
* पुण्याकडे जाणाऱ्या गाडय़ांना वर्षभर गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर नवीन गाडी सुरू करण्यात यावी तसेच गरीबरथ गाडी दररोज सोडण्यात यावी.
* पुण्यासाठी दूरान्तो एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी आहे.
* मुंबईला देखील कायम गर्दी असते. दूरान्तो एक्सप्रेस दररोज सोडण्यात यावी.
* अजनी रेल्वेस्थानकावर अधिकाधिक गाडय़ांना थांबे देण्यात यावे. नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाला पर्याय म्हणून अजनी रेल्वेस्थानक विकसित करण्यात यावे.