भंडारा : “खासदार राहुल गांधी यांनी सरकारची दुखणारी नस पकडली. त्यामुळेच कोंडीत सापडलेल्या सरकारने त्यांच्यावर सूडबुद्धीतून कारवाई केली आहे. या प्रकारानंतर न्यायपालिकाही सरकारच्या दबावात असल्याचे दिसून येते. मात्र, वास्तव लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने आणि लोकशाही व देश वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने लढा शेवटपर्यंत सुरू राहील”, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमचा न्यायपालिकेवर विश्वास आहे. मात्र, सध्या न्यायपालिका सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचे गावंडे म्हणाले. राहुल गांधी यांनी सभागृहात अदानी आणि मोदींचा संबंध काय? असा प्रश्न विचारला. अदानींच्या कंपनीला वीस हजार कोटी रुपये कुणी दिले? हे स्पष्ट व्हावे, तसेच संयुक्त संसदीय मंडळ बसवावे यासाठी आग्रह धरणाऱ्या राहूल गांधी यांना शेवटपर्यंत सभागृहात बोलू दिले नाही. याउलट सभागृहात राहुल गांधी जे काही बोलले तेसुद्धा सभागृहातील सीसीटीव्हीमधून डिलीट करण्यात आले. राहुल गांधी सरकारचा भांडाफोड करतील याची धास्ती घेत अखेर जुने प्रकरण उकरून काढले गेले. न्यायालयानेही अत्यंत तत्परता दाखवत निकाल देत राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. दुसरीकडे खासदारकी रद्द करून सभागृहात होणाऱ्या विषयांवर पडदा पडण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. ही सरकारची मुस्कटदाबी असल्याचे गावंडे म्हणाले.

हेही वाचा – वर्धा : आमदार रणजीत कांबळे यांचा तऱ्हेवाईकपणा! पत्रकारांकडून निषेध

हेही वाचा – धक्कादायक..! प्लास्टिकच्या पिशवीत बांधून स्मशानभूमीत फेकून दिला महिलेचा मृतदेह

मोदी आणि अदानी यांच्यातील वास्तविक संबंध आणि राहूल गांधी यांच्यावर झालेल्या खोट्या कारवाईची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेवटपर्यंत काँग्रेस पक्ष सत्याग्रह, सभा, मोर्चे या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सावरकरांच्या मुद्द्यावर सध्या पडदा पडला असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री बोरकर, जिल्हा प्रभारी नंदा पराते, प्रेमसागर गणवीर, उपस्थित होत्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana gawande of congress comment on central government says even the judiciary is under pressure from the government said ksn 82 ssb
First published on: 01-04-2023 at 11:12 IST