अकोला : ८० च्या दशकात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री व लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांनी राघू-मैना चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या नाना पाटेकर व मधू कांबीकर यांनी चित्रपटात अजरामर भूमिका साकारून आपल्या प्रभावी अभिनयाची छाप सोडली. दुर्दैवी योगायोग हा की, ‘राघू-मैना’ चित्रपटातील मुख्य अभिनेता व मुख्य अभिनेत्रीला अवघ्या पाच दिवसांच्या अंतराने मृत्यूने गाठले. नानांच्या पाठोपाठ आज मधू कांबीकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या आठवणीने अनेकांना गहिवरून आले.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने ८ ऑक्टोबरला निधन झाले. नानांच्या जाण्याच्या दु:खातून सावरत नाही तेच मराठी चित्रपटसृष्टीवर आणखी एक आघात झाला. ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचे पुण्यात निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या दमदार अभिनयाने आणि लावणीच्या खास शैलीने त्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

‘राघू’च्या भूमिकेत नाना, तर ‘मैना’ मधू कांबीकर यांनी साकारली

‘राघू मैना’ या १९८२-१९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि अत्यंत गाजलेल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन राजदत्त यांनी केले होते. या चित्रपटाला मराठी चित्रपटसृष्टीत आजही एक महत्त्वाचे स्थान आहे. मुख्य कलाकार म्हणून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर, निळू फुले, अशोक सराफ यांनी भूमिका केली. या चित्रपटाची निर्मिती माजी प्राचार्य डॅडी देशमुख यांनी केली होती. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण अकोला आणि पातूर परिसरात झाले. नानांना नायक म्हणून खरी ओळख या चित्रपटानेच दिली.

अभिनयाचे प्रचंड कौतुक

वसंत सबनीस यांच्या ‘तमासगीर’ या नाटकावर आणि पटकथेवर ‘राघू मैना’ चित्रपट आधारित आहे. तमाशा कलावंत मनोरंजन करत असताना स्वतःची वैयक्तिक दुःखे कशी बाजूला ठेवतात आणि पडद्यामागे त्यांचे जीवन किती संघर्षाचे असते, याचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे प्रचंड कौतुक झाले.

नृत्य आणि अभिनयाने चित्रपटात जिवंतपणा

ज्येष्ठ अभिनेत्री आणि खऱ्या आयुष्यातील लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांनी चित्रपटात ‘मैना’ या मुख्य नर्तिकेची भूमिका केली होती. त्यांच्या नृत्याने आणि अभिनयाने या चित्रपटाला जिवंतपणा आणला. चित्रीकरणाच्या वेळी त्यांचा अकोल्यात मुक्कम होता, त्या खूप मनमिळावू स्वभावाच्या होत्या, अशी भावना निर्माता स्व.डॅडी देशमुख यांचे सुपूत्र प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केली.

गाडगेबाबांच्या आईची भूमिका

२०१० मध्ये आलेल्या ‘डेबू’ चित्रपटात संत गाडगेबाबा यांची आई सखुबाई यांची भूमिका देखील ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांनी केली. त्या विशेष भूमिकेसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्री म्हणून महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारासाठी त्यांना नामांकन प्राप्त झाले. ‘डेबू’ चित्रपटाचे चित्रीकरण सुद्धा अकोला आणि परिसरात झाले. त्या अत्यंत मोठ्या कलावंत होत्या. चित्रीकरणाच्या वेळी अडचणीमध्येही त्यांनी जुळवून घेत प्रभावी भूमिका साकारल्याचे चित्रपटाचे निर्माता शत्रुघ्न बिडकर यांनी सांगून आठवणींना उजाळा दिला. अकोल्याच्या भूमीवर अभिनय साकारणारे दोन दिग्गज कलावंत अचानक गेल्याने कला विश्वात शोककळा पसरली आहे.