राजेश्वर ठाकरे

नागपूर : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे प्रथम क्रमाकांचे उमदेवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी आमदार व काँग्रेस नेते डॉ. आशीष देशमुख यांनी येथे केली. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पहिल्या क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसची मते फुटली. ही खेदाची बाब आहे. चंद्रकांत हंडोरे दलित समाजाचे आहेत. त्यांना निवडून आणणे अपेक्षित होते. त्यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा व मतफुटीची पक्षपातळीवर चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पाठवणार, असेही देशमुख म्हणाले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यापूर्वी १९९८ मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार राम प्रधान पराभूत झाले होते. त्यावेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांनी पद सोडले होते, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.