गोंदिया : राज्याच्या सध्या भोंदू बाबा खरात प्रकरण गाजत आहे. यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. फडणवीस सरकार हे या प्रकरणाचा राजकीय हेतूने वापर करत असून, “भोंदू बाबा हा प्रत्यक्षात फडणवीस सरकारचाच माणूस बनला आहे,” असा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी गोंदिया येथे पत्रकार परिषदेत केला. या प्रसंगी आमदार नाना पटोले यांच्यासोबत खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड आदी उपस्थित होते.

अद्याप पत्नीला का अटक नाही?

गोंदिया येथे पक्ष संघटनात्मक कामासाठी आलेल्या पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले, ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर ‘एफस्टीन फाईल’सारख्या प्रकरणांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘खरात फाईल’ तयार केली जात आहे. या कथित फाईलमध्ये सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री आणि आमदारांची नावे समोर येऊ शकतात. आ. पटोले म्हणाले की, भोंदू बाबा खरात प्रकरणाची चौकशी अनेक दिवसांपासून सुरू आहे, मात्र अद्याप त्याच्या पत्नीला अटक झाली नाही. तपासाची गती पाहता सरकारची भूमिका संशयास्पद वाटते.

सत्तेचा गैरवापर

पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत “आरोपींना अटक न करता इतरांवर आरोप करण्याचा सरकारला अधिकार आहे का?” असा सवाल केला. या प्रकरणाचा उपयोग करून सत्ताधारी पक्ष आपल्याच नेत्यांना ‘कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न करत आहे. “फाईल तयार करून दबावाचे राजकारण केले जात आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे,” असे पटोले म्हणाले. त्यांनी हेही नमूद केले की, राज्यातील पोलिस यंत्रणा अपेक्षित वेगाने काम करत नसल्याने जनतेमध्ये अविश्वास निर्माण होत आहे.

फडणवीसांना आव्हान

“राहुल गांधी यांची लोकप्रियता कमी असल्याचे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात. तेव्हा खरी लोकभावना समोर येईल,” असे आव्हान त्यांनी फडणवीस यांना दिले. निवडणूक प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, “निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली काम करत आहे,” माझ्या मते तर निवडणूक आयोग हा सरकारचा चपरासी सारखी भूमिका बजावत आहे अशी टीका केली. याचबरोबर, राज्यभर काँग्रेसकडून महागाई आणि शेतकरी प्रश्नांवर लवकरच तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रत्येक तालुका स्तरावर संघटनांना सक्रिय करून सरकारविरोधात लढा उभारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Nana patole (Photo- Loksatta)
पत्रकार परिषद घेत नाना पटोलेंनी सरकारवर गंभीर आरोप केले

हिंदू धर्माची बदनामी

दरम्यान, भोंदू बाबा प्रकरणामुळे धार्मिक आणि सामाजिक पातळीवरही अस्वस्थता निर्माण झाली आहे. “या प्रकारांमुळे हिंदू धर्माची बदनामी झाली असून, समाजात चुकीचा संदेश गेला आहे,” असे पटोलेंनी नमूद केले. एकूणच, भोंदू बाबा खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण केले असून, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. सरकार या आरोपांना कसे उत्तर देते आणि तपासाला कोणती दिशा मिळते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.