भंडारा : काँग्रेसच्या संवाद यात्रेच्या समारोपाप्रसंगी भंडाऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पार्टीवर घणाघाती आरोप करत टिकास्त्र सोडले आहे. नाना पटोले म्हणाले की, निवडणुका येताच किंवा त्यापूर्वी भाजपा काही ना काही प्रकरण उकरवून - घडवून आणत असतो. निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये ज्याप्रमाणे हिंदू आणि मुसलमानामध्ये दंगली घडवून आणल्यात, गोध्राकांड घडविण्यात आले, पुलवामा हल्ला करविण्यात आला आता त्याच पार्श्वभूमीवर आता निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराचा वापर होऊ शकतो. त्यामुळे राममंदिराला आता धोका होऊ शकतो, असे स्फोटक विधान नाना पटोले यांनी केले आहे. म्हणूनच धार्मिक स्थळांना लष्कराची सुरक्षा द्या, असे आधीच सत्यपाल मलीक म्हणाले आहे. त्यामुळे आता भाजपाकडून राम मंदिरालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे नाना पटोले म्हणाले. हेही वाचा - “देवेंद्र फडणवीस माझ्यामुळेच मुख्यमंत्री…!”, नाथाभाऊ स्पष्टच बोलले; म्हणाले, “त्यांची सुडाची वृत्ती…” हेही वाचा - “शिंदे गटाचे ४० आमदार अपात्र ठरणार”, नाना पटोलेंची भविष्यवाणी, ‘शेड्यूल १०’चा दिला संदर्भ नाना पटोले यांनी बेरोजगारांचा प्रश्नावर सरकारला घेरले आहे. नाना म्हणाले की, आता शासकीय नोकऱ्यांचे कंत्राट खासगी कंपन्यांना दिले जात आहे. खाजगी कंपनी पैसे कमविण्यासाठी बेरोजगार तरुण तरुणींकडून परिक्षा शुल्काच्या नावावर अधिकचे पैसे वसूल करून बेरोजगार तरुण तरुणींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप करीत आहे. सरकारने याची गंभीर दखल न घेतल्यास याचे परीणाम सरकारला लवकर भोगावे लागतील, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.