लोकसत्ता टीम

अकोला : गरिबांना वाटप करण्यात येणाऱ्या साड्यांमध्ये देखील त्यांनी दलाली केली, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नाना पटोले यांनी काही अपशब्दांचा देखील वापर केला. जिल्ह्यातील वाडेगाव येथे आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

वाडेगाव येथील कार्यक्रमासाठी नाना पटोले सोमवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. नाना पटोले यांची लाडूतूला होती. नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यातील वाडेगाव येथे प्रमोद डोंगरे यांच्या वतीने करण्यात आले होते.

आणखी वाचा-आधी म्हणतात पेरणीला लागा, आता म्हणतात घाई करू नका; हवामान खात्याचे चालले तरी काय?

या लाडूतूला कार्यक्रमात निराधार महिलांना साडी आणि चोळीचे वाटप करण्यात आले. त्याचा धागा पकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतले. आया-बहिणींना साडी घेऊन द्यायची व त्यामध्ये देखील दलाली घ्यायची. गरिबांच्या साड्यांमध्ये देखील यांनी दलाली केली आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. यावेळी त्यांनी काही वैदर्भीय अपशब्दांचा देखील वापर केला.

दरम्यान, या कार्यक्रमानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्याने पाण्याने धुतल्याचा प्रकार वाडेगाव येथे समोर आला. संत श्री गजानन महाराजांची पालखी वाडेगाव येथे मुक्कामी होती. पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी चिखलातून मार्ग काढत संत श्री. गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. मैदानावरील चिखलामुळे नाना पटोले यांचे पाय मातीने माखले होते.

आणखी वाचा-महापारेषणची पदभरती प्रक्रिया रद्द, उमेदवारांमध्ये संताप; एसईबीसी आरक्षणावरून…

ते एका कार्यकर्त्याने धुतले. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी विजय गुरव असे काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव आहे. नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेण्याच्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नाना पटोले यांचा अकोला दौरा अन् वाद

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचा अकोला दौरा आणि वाद निर्माण होणे हे समीकरणच तयार झाले. या अगोदर लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाना पटोले अकोला येथे आले असता त्यांनी भाजप नेते संजय धोत्रे यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून विरोधकांनी नाना पटोले यांना लक्ष्य केले होते. आता पुन्हा एकदा नाना पटोले यांनी अपशब्दांचा वापर करण्यासह कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याने वाद निर्माण झाला.