विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि नागपूर NIT कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणारवरून पहिल्या आणि दुसरा दिवस गाजल्यानंतर आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तत्पूर्वी या मुद्द्यावरून टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-भाजपा सरकारवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले नाना पटोले?
“खोटारडेपणा आणि चेष्टा, हा भाजपाचा खरा चेहरा आहे. हे आता विदर्भाच्या जनतेला कळायला लागले आहे. नरेंद्र मोदींनी करोना काळात लावलेले निर्बंध आणि जनतेचे झालेले हाल भाजपा विरसली असून त्यांच्यासारखी वाईट मानसिकता असलेली लोकं या देशात बघायला मिळणार नाही”, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
“२०१४ ते २०१९ दरम्यान भाजपा सरकारने विदर्भासाठी काय केलं? याबाबत सांगण्यासारखं त्यांच्याकडे काहीही नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कामावर चर्चा करण्याचा प्रस्ताव शिंदे सरकार मांडण्याच्या तयारीत आहे. मात्र, आज आम्ही त्यांचे पितळ उघडं करू”, असा इशाराही त्यांनी दिला.
सीमावादाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र सोडले. आज कर्नाटक सरकारदेखील महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही, असा ठराव त्यांच्या विधानसभेत मांडणार आहे. मात्र, जे आमचं आहे, ते आम्ही घेऊच. केंद्र सरकारच्या आशीर्वादानेच कर्नाटक सरकार महाराष्ट्रावर दबाव आणण्याचा प्रयत्न करते आहे. गुजरातच्या निवडणुकीदरम्यानसुद्धा राज्यातील उद्योग गुजरातमध्ये नेऊन महाराष्ट्राला बरबाद करण्याचे काम त्यांनी केले आहे. केंद्रातील मोदी सरकार असे प्रकार सातत्याने करते आहे. महाराष्ट्रातील जनते हे कधीच मान्य करणार नाही, असेही ते म्हणाले.