गडचिरोली : जिल्ह्यातील धान खरेदी, भरडाई आणि राईस मिलिंग प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांविरोधात काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी गेल्या वर्षभरात संबंधित विभागाचे मंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तब्बल ७० हून अधिक तक्रारी व निवेदने सादर केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या तक्रारींपैकी अनेक प्रकरणांची चौकशी होऊन कारवाईही करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अचानक पटोले यांच्या नावे तक्रारी मागे घेतल्याचे कथित बनावट पत्र मंत्रालयात पोहोचल्याने या संपूर्ण प्रकरणामागे नेमका कोणाचा डाव आहे, प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
धान घोटाळ्याबाबत आक्रमक भूमिका
धान घोटाळ्याच्या मुद्द्यावर सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या पटोले यांनी वर्षभरात अनेक तक्रारी दाखल केल्या असताना, त्यापैकी केवळ दोन तक्रारी मागे घेण्यासाठी पत्र पाठविण्याची गरज काय, हा प्रश्न सुरुवातीपासूनच उपस्थित होत होता. त्यातच हे पत्र बनावट असल्याचा दावा स्वतः पटोले यांनी केल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उद्देशून नाना पटोले यांच्या नावाने एक पत्र प्रसारित झाले होते.
या पत्रात धान खरेदी आणि राईस मिलिंगमधील कथित गैरव्यवहारांबाबत करण्यात आलेल्या दोन गंभीर तक्रारी मागे घेत असल्याचे नमूद करण्यात आले होते. तक्रार करताना वस्तुस्थितीची पूर्ण माहिती नव्हती आणि आता ती समजल्याने तक्रारी मागे घेत असल्याचा उल्लेखही पत्रात होता. मात्र, या पत्राशी आपला कोणताही संबंध नसल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या नावाने प्रसारित झालेले पत्र बनावट असून आपण कोणतीही तक्रार मागे घेतलेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
अनेक गंभीर प्रकरणांवर पटोलेंचा पाठपुरावा
पटोले यांनी यापूर्वी कुरूड येथील गोदाम भाडेप्रकरण, धान भरडाई प्रक्रियेतील अनियमितता, तांदूळ साठवणूक तसेच काही राईस मिल्सशी संबंधित कथित गैरव्यवहारांबाबत गंभीर आरोप केले होते. शासनाची फसवणूक, धानाची अफरातफर आणि अधिकाऱ्यांशी संगनमताचे आरोप असलेल्या अनेक तक्रारींची शासनाने दखल घेत चौकशी सुरू केली होती. काही प्रकरणांमध्ये कारवाई झाल्याची माहितीही समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर तक्रारी मागे घेतल्याचे कथित पत्र अचानक समोर येणे हे अनेक प्रश्न निर्माण करणारे ठरत आहे. धान घोटाळ्याशी संबंधित चौकशीची धार बोथट करण्यासाठी, तक्रारींची विश्वासार्हता कमी करण्यासाठी किंवा संबंधित हितसंबंधी घटकांना दिलासा देण्यासाठी हा प्रयत्न झाला काय, अशी चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.
देसाईगंज येथील वादग्रस्त नेत्यावर संशय
दरम्यान, या बनावट पत्रप्रकरणात देसाईगंज येथील एका वादग्रस्त स्वयंघोषित नेत्याचा हात असल्याचीही जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. धान घोटाळ्याशी संबंधित काही घटकांशी त्याचे कथित संबंध असल्याच्या चर्चांमुळे संशय अधिक गडद झाला आहे. हे पत्र पटोले यांच्या कार्यालयातून त्यांच्या नकळत पाठविण्यात आले की बाहेरील कुणीतरी त्यांच्या नावाचा गैरवापर करून मंत्रालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. धान घोटाळ्याशी संबंधित हितसंबंधी घटक, मध्यस्थ आणि कथित लाभार्थी यांचाही या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याची चौकशी झाल्यासच या बनावट पत्रामागील खरे सूत्रधार समोर येऊ शकतील, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
