नागपूर : माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाद्यपूजनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पाद्यपूजनाच्या व्हिडीओने निर्माण केला वाद

काँग्रेसचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाद्यपूजनाचा व्हिडिओ सामाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला सुरुवात झाली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त रत्नागिरी येथे आयोजित कार्यक्रमात काही कार्यकर्त्यांनी पटोले यांचे दुधाने पाद्यपूजन केले होते. या घटनेनंतर विरोधकांनी काँग्रेसवर टीका करत व्यक्तिपूजेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. या प्रकारामुळे काँग्रेसमधील काही नेत्यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे समजते. पक्षाची विचारसरणी आणि सार्वजनिक प्रतिमा लक्षात घेता अशा घटनांपासून दूर राहण्याची गरज असल्याचे मत वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे.

दिल्लीतील नेतृत्वाकडूनही घेतली दखल

पाद्यपूजनाचा व्हिडिओ आणि त्यानंतर झालेली राजकीय चर्चा काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचल्यानंतर पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या प्रकरणाची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसच्या विचारधारेत व्यक्तिपूजेला स्थान नसल्याने अशा घटनांमधून चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी भावना पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे पटोले यांच्या भूमिकेबाबत नेतृत्वाने नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. मात्र, या प्रकरणावर काँग्रेसकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

पटोलेंचे नांदेडमधील कार्यकर्ते चर्चेत

व्हिडिओ चर्चेत आल्यानंतर पाद्यपूजन करणाऱ्या कार्यकर्त्यांची माहिती समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते अनिल पाटील चिमेगावकर आणि माधव पोवळे यांनी रत्नागिरी येथे जाऊन पटोले यांचे पाद्यपूजन केल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पटोले यांना सामाजिक क्षेत्रातील गुरू मानून हिंदू परंपरेनुसार श्रद्धेने ही कृती केल्याचे दोन्ही कार्यकर्त्यांनी सांगितल्याचे समजते. या पाद्यपूजनामागे कोणताही राजकीय हेतू नसून ते वैयक्तिक श्रद्धेतून करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काँग्रेसच्या प्रतिमेवर चर्चेचे सावट

पाद्यपूजनाच्या घटनेमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा सुरू झाली असून पक्षाच्या सार्वजनिक प्रतिमेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसमध्ये नेत्यांचा सन्मान केला जात असला तरी अशा स्वरूपाच्या कृतींमुळे पक्षाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होतात, असे काही नेत्यांचे मत आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. आगामी काळात पक्ष नेतृत्व या विषयावर काही भूमिका मांडते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.