भंडारा : भाजपच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी भंडाऱ्यात काँग्रेसचा ‘डमी’ उमेदवार देण्यात आला असून कोट्यवधी रुपये घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी केला आहे. वाघाये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले. यातूनच वाघाये आरोप करीत असल्याचे बोलले जात आहे.

नाना पटोले यांच्यावर आरोप करताना सेवक वाघाये म्हणाले की, भंडारा-गोंदियाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नातेवाईक आहेत. त्यांना जिंकवण्यासाठीच काँग्रेसने भंडाऱ्यात डमी उमेदवार दिला. लोकसभेत भाजप जिंकणार आणि त्या बदल्यात साकोली विधानसभेचा नाना पटोले यांचा मार्ग मोकळा होईल. डॉ. प्रशांत पडोळे यांनी त्यांच्या वडिलांची जमीन विकून उमेदवारीसाठी नाना पटोले यांना ५ कोटी रुपये दिल्याच्या चर्चा आहे.

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

सेवक वाघाये यांनी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र, काँग्रेस पक्षाने डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज असलेल्या सेवक वाघाये यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

हेही वाचा – महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

मी लोकसभा लढावी, अशी जनतेची मागणी असल्याने उमेदवारी दाखल केली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेने उमेदवार असलेल्या डॉ. पडोळे यांना केवळ दोन हजार मते मिळाली होती आणि अशा उमेदवाराला काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचा उमेदवार ज्याने कधीही काँग्रेसचा पंजा हातात घेतला नाही, बॅनर-पोस्टर हातात घेतले नाहीत, अशाला तिकीट देण्यात आले. भंडारा आणि गडचिरोली लोकसभेची तिकीट विकल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसमधील नेते पक्ष सोडून जात आहेत. गोंदियाच्या माणसाला गडचिरोलीची उमेदवारी दिली. पैसे देऊन उमेदवारी देणे हा चुकीचा प्रकार असल्याचे सेवक वाघाये म्हणाले.

हेही वाचा – विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

माझ्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करेन

यापूर्वी नाना पटोलेंनी सुधाकर गणगणेंना पाडल्यानेच विलासरावांनी त्यांना पक्षातून काढले होते. दहा वर्षांनंतर भाजपातून काँग्रेसमध्ये आल्यानंतर राहुल गांधी, सोनिया गांधी यांना महाराष्ट्रातील राजकारणाची माहिती नसल्याने त्याचा फायदा घेऊन हे काँग्रेसमध्ये काम करीत आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी एआयसीसीच्या बैठकीत जो उमेदवार २०१४ च्या निवडणुकीत केवळ २१०० मते घेऊन पराभूत झाला, अशा डॉ. पडोळेच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली. आम्ही पक्ष उभा केला, नानांमुळे पक्ष संपायला लागला आहे. माझ्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करेन. शक्य झाल्यास काँग्रेस वाचवण्यासाठी माझी उमेदवारी कायम राहील, असेही सेवक वाघाये म्हणाले.