लोकसत्ता टीम

भंडारा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा आढावा घेत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने सर्व विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांची नावे मागितली आहेत. विशेष म्हणजे या नावांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आपला अर्ज सादर केला आहे. त्यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे पुन्हा एकदा उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आता नाना पटोले यांनी सुद्धा पुन्हा एकदा स्वतः विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी १६ ऑगस्टला प्रचाराचा नारळ फोडणार आहे तर महायुती २० ऑगस्टला आपला प्रचार सुरू करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षानं २८८ विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं आगामी विधानसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्या काँग्रेस पक्षातील उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. त्यात साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले यांचा एकमेव अर्ज भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीकडे प्राप्त झाला आहे. त्यामुळे नाना पटोले हेच या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. अर्जासोबत नाना पटोले यांनी पक्षाच्या आदेशाप्रमाणे वीस हजार रुपयांचा डीडी देखील पक्षाला सादर केला आहे. या विधानसभा मतदारसंघाबरोबरच भंडारा विधानससभेसाठी ११ तर तुमसर विधानसभेसाठी ६ अशा एकूण तीन विधानसभेसाठी १८ उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

आणखी वाचा-सोने दरात पुन्हा मोठे बदल, दागिने खरेदीबाबत ग्राहक चिंतेत…

साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले यांचा एकमेव अर्ज भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीकडं प्राप्त झाला आहे. या अर्जासोबत नानांनी पक्षादेशाप्रमानं २० हजार रुपयांचा डीडी पक्षाला दिला आहे. भंडारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांच्याकडे नाना पटोले यांचा अर्ज त्यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी आणि स्विय सहाय्यक राजू पालीवाल यांनी सादर केलाय. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा-सावधान! रस्ते वाहतूक मंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्याच गृहशहरात अपघाती मृत्यूचे शतक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुका लढवल्या गेल्या. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी नाना पटोले यांच्यावर काँग्रेस पक्षातीलच अनेक नेत्यांनी आरोप केले होते. काँग्रेस पक्षातील नेते पक्ष सोडून जात होते. त्यावेळी नाना पाटोले यांच्यावर या नेत्यांनी अनेक गंभीर आरोप केले. त्यामुळे नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाना पटोले यांच्यावर विश्वास दाखवला आणि लोकसभा निवडणूक देखील त्यांच्या नेतृत्वात लढण्याचा निर्णय झाला. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रतिसादनंतर नाना पटोले यांचे पद कायम राहिले आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुका देखील त्यांच्या नेतृत्वातच लढल्या जाणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.