नागपूर : व्यंकटेश नगर येथे १ मे रोजी घडलेल्या मायलेकींच्या आत्महत्येनंतर धक्कादायक बाबी पोलीसांच्या तपासात समोर आल्या आहेत. वंशाला दिवा हवा म्हणून मुलगा आणि वडिलोपार्जित शेतजमीन नावावर करून देण्यासाठी छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींमुळेच आधी विवाहितेने आणि नंतर तिच्या आईने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी केलेल्या प्रथामिक तपासातून आढळले आहे. त्यामुळे या घटनेला आता हुंडाबळीचे वळण लागल्याने मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात विवाहितेचा छळ करणारा पती, सासू- सासरा, नणंद आणि तिचा पती या पाच जणांवर नंदनवन पोलिसांनी हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. वडिलोपार्जित संपत्तीसाठी झालेल्या छळातून माय-लेकीने आत्महत्या केल्याचे तपासातून उघड झाले आहे.

संगिता श्रीराम ढबाले (५२) आणि त्यांची विवाहित मुलगी आकांक्षा लोकेश ब्रम्हे (२९) या दोघींनी १ मे या दिवशी व्यंकटेश नगर येथील घरी एकाच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रारंभी या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र पुढील चौकशीत आणि आकांक्षाचे मामा विलास केशवराव पिसे (४७) रा. मौदा) यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सोमवारी सासरच्या पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

नंदनवन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा हिच्या विवाहानंतर तिचा पती लोकेश ब्रम्हे, सासरा सुधाकर, सासू अनुसया, नणंद प्राची डफ आणि तिचा पती अमोल डफ हे हुंड्यासाठी आकांक्षाचा छळ करत होते. तिला सातत्याने माहेरून पैसे आणण्यावरून छळ केला जात होता. दरम्यान आकांक्षाने मुला एवजी मुलीला जन्म दिला. मात्र हे मूल जगू शकले नाही. या मृत्यूचा ठपका ठेवत सासरच्यांनी पुन्हा तिचा छळ सुरू केला. याशिवाय आई संगिता आणि आकांक्षा या दोघींच्या नावावर असलेली शेतजमीन आपल्या नावावर करून घेण्यासाठीही दोघींवर दबाव टाकला जात होता. या सततच्या छळामुळेच मायलेकींनी १ मे या दिवशी टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली, अशा आशयाची तक्रार संगिता यांचे भाऊ आणि आकांक्षा यांचे मामा विलास पिसे यांनी नंदनवन पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले. त्या आधारावर पोलिसांनी पतीसह पाच जणांवर हुंडाबळी प्रतिबंधक कलमे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठ्यांनी फोडली वाचा

आत्महत्येपूर्वी दोघींनी लिहिलेल्या चिठ्ठ्याही पोलिसांना घटनास्थळी आढळल्या. यात आकांक्षाने आपल्या पत्रात नवजात बाळाच्या मृत्यूचा, वडिलांच्या निधनाचा आणि मानसिक तणावाचा उल्लेख करत अंत्यसंस्कार माहेरी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. “वडिलांच्या अस्थी ज्या अंबाळा तलावात विसर्जित केल्या, त्याच ठिकाणी माझ्याही अस्थी विसर्जित करा,” अशी भावनिक विनंती तिने केली. तर संगिता ढबाले यांनी आपल्या पत्रात “हा निर्णय मी स्वतः घेत आहे, कोणालाही जबाबदार धरू नका,” असे नमूद केले होते. त्याच आधारावर आकांक्षाच्या मामाने केलेल्या तक्रारीच्या आधारवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.