यवतमाळ : मानवतेची सेवा हाच परमधर्म मानून कार्यरत असलेल्या यवतमाळच्या नंददीप फाउंडेशनच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेली असहाय्य मनोरुग्ण भगिनी सीमा हिला संस्थेच्या तत्परतेमुळे आणि डॉक्टरांच्या कौशल्यामुळे नवजीवन मिळाले.

उपचारांसाठी मिशन सीमाताई

सीमा मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराने त्रस्त होती. तिच्या दोन्ही किडनींमध्ये इन्फेक्शन झाले. सीमाला अत्यंत गंभीर अवस्थेत  नंददीप फाऊंडेशनचे संदीप शिंदे यांनी बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात आणले होते. त्यांच्याच पुढाकारात तिच्यावर उपचारासाठी ‘मिशन सीमाताई’ हा उपक्रम राबविण्यात आला आणि लोकसहभागातून सीमावर यशस्वी उपचार करून तिला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यात डॉक्टरांना यश आले. 

गंभीर वैद्यकीय आव्हान आणि शस्त्रक्रिया

काही दिवसांपूर्वी सीमाची प्रकृती अत्यंत खालावली होती. वैद्यकीय निदानानुसार, तिच्या दोन्ही किडनीमध्ये गंभीर संसर्ग (पस) झाला होता, स्टोनची समस्या होती आणि क्रिएटिनिनचे प्रमाण धोक्याच्या पातळीच्या पलीकडे गेले होते. ही स्थिती कोणत्याही क्षणी जीवघेणी ठरू शकली असती. या आणीबाणीच्या प्रसंगी, यवतमाळ येथील साईश्रद्धा हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले. येथे डॉ. विजय मून, डॉ. शिवचरण भालगे आणि डॉ. आशिष लडे यांच्या नेतृत्वाखाली ही जोखमीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे तीन तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत सीमाच्या शरीरातून तब्बल ४५० ग्रॅम पस बाहेर काढण्यात आला. किडनीवरील दाब कमी करून संसर्ग नियंत्रित केल्यामुळे तिच्या जीवाला असलेला धोका टळला आहे.

संवेदनशील प्रशासकीय आणि सामाजिक सहकार्य

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे समाजातील विविध घटकांनी दाखवलेली संवेदनशीलता. यवतमाळचे तहसीलदार योगेश देशमुख यांनी प्रशासकीय स्तरावर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तातडीने करून दिली. वैद्यकीय क्षेत्रातूनही मदतीचा ओघ सुरू झाला. डॉ. पूर्वा अग्रवाल यांनी सीटी स्कॅन आणि डॉ. सोनाली देशपांडे यांनी सोनोग्राफी सेवा पूर्णतः निःशुल्क उपलब्ध करून देऊन सामाजिक बांधिलकी जपली.

मानवतेची सामूहिक शक्ती

नंददीप फाउंडेशनचे संस्थापक संदीप शिंदे व नंदिनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण टीमने या कार्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. या मोहिमेत मेजर मनोज तामगाडगे, माणिक मेहरे, डॉ. प्रवीण राखुंडे, डॉ. कविता बोरकर, डॉ. संतोष बोरकर, अविनाश धनेवार, रवी धलवार, रवी ठाकूर आणि संजय बोरूले तसेच डॉ. रेश्मा कंकाळ यांनी सीमाची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेऊन तिला मानसिक आणि वैद्यकीय आधार दिला. डॉ. विजय मून व डॉ. पूजा मून यांचे विशेष पाठबळ या कार्यास लाभले.

सीमाला जगण्याची नवी उमेद मिळाली

मनोरुग्ण असल्याने कुटुंबाने दूर सारलेल्या सीमाला या कठीण प्रसंगात अनेकांची साथ मिळाली. शस्त्रक्रियेनंतर सीमाच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य नंददीप फाउंडेशनच्या निस्वार्थ सेवाभावाचे यश असल्याचे संदीप शिंदे म्हणाले. आणखी पंधरा दिवसांनंतर सीमावर दुसरी शस्त्रक्रिया केली जाईल. मात्र या घटनेने माणुसकीच्या सीमा विसरून समाज एकत्र येतो, तेव्हा मृत्यूवरही विजय मिळवता येतो, याची प्रचिती पुन्हा आली.