Indian railways new trains: अकोला : नांदेडवरून हिंगोली, वाशीम अकोला मार्गे थेट मुंबईसाठी नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याच्या मागणीला अखेर अनेक वर्षांनंतर यश आले आहे. हजूर साहिब नांदेड – एलटीटी दरम्यान दोन नवीन साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना मंजुरी देण्यात आली. अकोला, वाशीम, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील प्रवाशांचा मुंबईशी थेट रेल्वेने संपर्क होईल. प्रवाशांसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे.

आठवड्यातून दोन दिवस धावणार

रेल्वे मंत्रालयाने हजूर साहिब नांदेड आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई दरम्यान अकोला-भुसावळ-कल्याण मार्गे दोन नवीन साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना मंजुरी दिली. हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस धावेल.

चार क्रमांकाच्या गाड्या

गाडी क्रमांक १७६६५ २५ मेपासून दर सोमवार नांदेडहून रात्री २१.१५ वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी मंगळवार दुपारी १३.४० वाजता गाडी एलटीटी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक १७६६६ २६ मेपासून दर मंगळवारी एलटीटी येथून सकाळी ०९.१० वाजता निघणार असून बुधवारी सकाळी ८.१० वाजता नांदेडला पोहोचेल. गाडी क्रमांक १७६६७ २० मेपासून दर बुधवारी नांदेडहून रात्री २१.१५ वाजता सुटणार असून गुरुवारी दुपारी १३.०० वाजता एलटीटी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक १७६६८ २१ मेपासून दर गुरुवारी एलटीटी हून सकाळी ०९.१० निघणार असून शुक्रवार सकाळी ९.०० वाजता नांदेडला पोहोचेल.

या स्थानकावर राहणार थांबा

या एक्सप्रेस गाड्या क्रमांक १७६६५ / १७६६७ अकोला येथे रात्री ०३.३५ आगमन होऊन ०३.४० वाजता प्रस्थान करेल. गाडी क्रमांक १७६६६ / १७६६८ रात्री ०३.०० वाजता आगमन व ०३.०५ वाजता प्रस्थान होणार आहे. या गाडीला पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण या स्थानकावर थांबा राहणार आहे.

मुंबईसाठी थेट सेवेने मोठा लाभ – खासदार अनुप धोत्रे

नांदेडवरून अकोलामार्गे मुंबईसाठी गाड्या सुरू करण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून केल्या गेली होती. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच होता. अखेर रेल्वे मंत्रालयाने दोन एक्सप्रेस गाड्यांना मंजुरी दिली. या गाड्यांमुळे भाविक, विद्यार्थी व व्यापाऱ्यांना मुंबईसाठी थेट सेवा मिळेल. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी केले आहे.