Nanded LTT Express train timetable issues: अकोला : नांदेडवरून हिंगोली, वाशीम व अकोला मार्गे मुंबईसाठी रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी सहा वर्षांनंतर अखेर पूर्ण झाली. उद्घाटन विशेष गाडी १९ मे रोजी धावणार आहे. नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या नवीन साप्ताहिक एक्स्प्रेस गाडीच्या उद्घाटनाची वेळ सोयीस्कर असली तरी नियमित वेळ प्रचंड गैरसोयीची आहे. हिंगोली, वाशीम व अकोला रेल्वेस्थानकावरून ही गाडी मध्यरात्री धावणार असून एलटीटी येथे दुपारी पोहोचणार आहे. नव्या रेल्वेगाडीच्या असुविधाजनक वेळापत्रकामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी असून त्यामध्ये बदल करण्याची मागणी होत आहे.
उद्घाटन विशेष एकमार्गी गाडी
दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधा व सातत्यपूर्ण मागणी लक्षात घेऊन हजूर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान नवीन साप्ताहिक एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे मंडळाच्या मान्यतेनंतर गाडी क्रमांक १७६६५, १७६६६, १७६६७ आणि १७६६८ या दोन साप्ताहिक एक्सप्रेस गाड्या पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे धावणार आहेत. उद्घाटन विशेष एकमार्गी गाडी क्रमांक ०७६६७ नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस ही १९ मे रोजी नांदेड येथून सायंकाळी ४ वाजता सुटेल व पुढील दिवशी सकाळी ७.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
नियमित सेवेत मात्र ही गाडी २० मेपासून प्रत्येक बुधवारी रात्री २१.१५ वाजता सुटेल व पुढील दिवशी दुपारी १ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी हिंगोली (रात्री ००.२५), वाशीम (मध्यरात्री ०१.१५), अकोला येथे (पहाटे ०३.४५) येणार आहे. परतीच्या प्रवासात देखील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ही गाडी दुपारी १६.३५ वाजता सुटेल व पुढील दिवशी सकाळी ०९.१० वाजता नांदेड येथे पोहोचेल. ही गाडी अकोला (पहाटे ०३.०५), वाशीम (०४.१५) व हिंगोली येथे (०५.२५ वाजता) पोहोचणार आहे.
उद्घाटन गाडीला अडचण नाही, तर नियमितला अडचण काय?
भौगोलिक परिस्थिती, प्रवाशांची सुरक्षा आणि वेळेचे गणित यांचा कुठलाही विचार न करता या गाडीचे वेळापत्रक ठरवल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे. हे वेळापत्रक लक्षात घेता ‘रेल्वे दिली की जनतेच्या जखमेवर मीठ चोळले?’ असा संतप्त सवाल केला जात आहे.
उद्घाटनाच्या गाडीची वेळ सोयीस्कर ठेवण्यात कुठलीही अडचण येत नाही, तर नियमित गाडी त्याच वेळापत्रकानुसार सोडण्यात कोणती अडचण येते? उद्घाटनात लोकप्रतिनिधी आणि नेत्यांचा कौतुक आणि श्रेयवादाचा सोहळा संपला की सर्वसामान्य प्रवाशांना मध्यरात्रीच्या नरकयातना कशासाठी? असे अनेक प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केले जात आहेत.
