अकोला : मराठवाडा, विदर्भातून नांदेडवरून अकोला मार्गे थेट मुंबईसाठी हजूर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान दोन साप्ताहिक गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. सोबतच उत्तर भारतातील देवभूमी उत्तराखंडमध्ये जाण्यासाठी हजूर साहिब नांदेड-टनकपूर साप्ताहिक एक्सप्रेस नियमित स्वरूपात सुरू होणार आहे. ही साप्ताहिक एक्स्प्रेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधील महत्त्वाच्या शहरांना थेट जोडणार असून यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी, व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

दोन दशकांची मागणी अखेर पूर्ण

नांदेडवरून मुंबईसाठी अकोलामार्गे गाडी सुरू करण्याची मागणी गत २० वर्षांपासून सुरू होती. अखेर ती मागणी पूर्ण झाली. गाडी क्र. १७६६७ हजूर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी नांदेड येथून प्रत्येक बुधवारी रात्री २१.१५ वाजता सुटेल आणि पूर्णा (२२.१५) , बसमत (२३.१५) हिंगोली (००.२५), वाशीम (०१.१५), अकोला (०३.४०), मनमाड (०८.१२) मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे गुरुवारी दुपारी १३.०० वाजता पोहोचेल. आज, ८ जुलैपासून या गाडीला प्रारंभ होत आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर गुरुवारी सुटणार

परतीच्या प्रवासात गाडी क्र. १७६६८ लोकमान्य टिळक टर्मिनस-हजूर साहिब नांदेड गाडी प्रत्येक गुरुवारी सायंकाळी १६.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि मनमाड (२२.१०), अकोला (०३.०५), वाशीम (०४.१५), हिंगोली (०५.२५), बसमत (०६.२५), पूर्णा (०७.४५) मार्गे नांदेड येथे शुक्रवारी सकाळी ९.१० वाजता पोहोचेल. या गाडीची नियमित सेवा ०९ जुलैपासून सुरु होईल. याच प्रकारे प्रत्येक सोमवारी गाडी क्र. १७६६५ नांदेडवरून, तर गाडी क्र. १७६६६ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी गाडी सुटणार आहे.

नांदेड-टनकपूर एक्स्प्रेस १२ जुलैपासून नियमित धावणार

गाडी क्र. १७६३१ हजूर साहिब नांदेड-टनकपूर साप्ताहिक एक्स्प्रेस १२ जुलैपासून नियमित धावणार असून दर रविवारी रात्री २३.४० वाजता हजूर साहिब नांदेड येथून सुटेल. त्यानंतर पूर्णा येथे ००.५० वाजता, बसमत येथे १.३० वाजता, हिंगोली येथे ०२.३५ वाजता, वाशीम येथे ०३.५५ वाजता आणि अकोला जंक्शन ०५.४५ वाजता थांबून पुढे टनकपूरकडे प्रस्थान करेल. टनकपूर येथे सकाळी ०५.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्र.१७६३२ टनकपूर-हजूर साहिब नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस १४ जुलैपासून नियमित धावणार असून दर मंगळवारी सकाळी ९.०० वाजता टनकपूर येथून सुटेल. अकोला जंक्शन येथे १०.५५ वाजता, वाशीम येथे १२.२० वाजता, हिंगोली येथे १३.०५, बसमत १३.४५, पूर्णा १४.५० वाजता थांबून बुधवारी सायंकाळी १६.३० वाजता हजूर साहिब नांदेड येथे पोहोचणार आहे.