नागपूर: महाराष्ट्रात १९७६ पासून गोहत्या बंदी आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा २०१५ द्वारे ही बंदी अधिक कडक करण्यात आली आणि बैलांनाही लागू करण्यात आली. या कायद्यानुसार ५ वर्षांचा तुरुंगवास आणि १०,००० रुपये दंड अशी शिक्षा आहे. मोदी सरकारच्या काळात गोहत्तेसाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये गोसंरक्षणासाठी नवीन उपक्रम राबवला जात आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील जनावरांच्या गोठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यातून त्यांची मुक्तता व्हावी, मोकाट जनावरांच्या त्रासातून सुटका व्हावी, यासाठी दहा वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाने भांडेवाडीलगतच्या वाठोडा परिसरात ४४.०६ एकर परिसरात ३९.१२ कोटीचा ‘नंदग्राम’ प्रकल्प लवकरच पुर्नत्वास येणार आहे. 

 नागपूर शहरात १०४६ गोठे आहेत. यात ४५७ अधिकृत तर ५८९ अनधिकृत आहेत. वर्दळीच्या व निवासी भागातील गोठ्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो. आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. अनेक गोपालक आपली जनावरे मोकाट सोडतात. यामुळे अपघात होतात. याचा विचार करता शहरातील जनावरांचे गोठे शहराबाहेर स्थलांतरित करण्यासाठी नंदग्राम प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती. सुरुवातीला गोरेवाडा परिसरातील २० हेक्टर खासगी जागेत हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मनपाची आर्थिक परिस्थिती विचारात घेता, हा प्रकल्प राबविणे शक्य नसल्याने वाठोडा परिसरातील मनपाच्या जागेवर हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे प्रत्येकी १० जनावरांसाठी ४६८ शेड उभारले आहेत. यात ४,६८० जनावरांची व्यवस्था केली जाणार आहे. सोबतचा गुरांचा दवाखाना, पाणीपुरवठा, दूध साठविण्यासाठी शीतगृह, चराईक्षेत्र, गोपालकांच्या निवासाची सुविधा अशा बाबींचा या प्रकल्पात समावेश आहे.

नियमाचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी

जनावरांच्या गोठ्यांना परवानगी देण्याचे अधिकार पशुसंवर्धन विभागाला आहेत. परवानगी घेतलेले ४५७ गोठे असून, विना परवानगी ५८९ गोठे आहेत. दाट वस्तीतील गोठ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा गोपालकांकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे तसेच महाराष्ट्र किपिंग अँड मुव्हमेंट ऑफ कॅट इन अर्बन एरिया (नियंत्रण) अधिनियम, १९७६ चे पालन केले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

असा आहे नंदग्राम आराखडा

– ४४.०६ एकर परिसरात ३९.१२ कोटींचा प्रकल्प

– एका छताखाली ४,६८० जनावरे

– मनपा ४६० शेड उभारणार

– प्रत्येक शेडमध्ये १० जनावरांची व्यवस्था

– गोरक्षकाचे निवास व चरण्यासाठी २ एकरचे मैदान

– गोपालकासाठी राहण्याची व्यवस्था

– जनावरांना चरण्यासाठी तीन मोकळी मैदाने

– जनावरांवर उपचारांसाठी पशुवैद्यकीय अधिकारी