Teachers Census Duty 2027: वर्धा : सध्या शिक्षक वर्गाचे सुट्ट्यांचे दिवस. पण जनगणना व अन्य कामे कर्तव्य म्हणून शासनाने त्यांच्यावर सोपविली आहे. भर उन्हात हा वर्ग SIR व जनगणनेची कामे करीत आहे. हा दगदग देणारा व स्वतःचे पैसे खर्च करायला लावणारा प्रकार, असे म्हणतात. पण किमान खर्च मिळावा ही अपेक्षा. ती मान्य झाली नाही. मात्र राज्यातील एकमेव अशी जिल्हा परिषद जिने शिक्षकांना खर्च देण्याचे मान्य केले.
‘ही’ ती जिल्हा परिषद
प्राथमिक शिक्षकांना मे २०२६ च्या वेतनात प्रवास व प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय नंदुरबार जिल्हा परिषदेने घेतला आहे. दीर्घ सुटीच्या कालावधीत प्रशिक्षण घेतलेल्या तसेच जनगणना कामावर नियुक्त असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचा प्रवास भत्ता (TA) आणि प्रोत्साहन भत्ता आगामी मे २०२६ च्या वेतनातून एकत्रितपणे अदा करण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकृत आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जारी केले आहेत.
माहिती सादर करण्याचे आदेश
नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी (BDO) आणि गटशिक्षणाधिकारी (BEO) यांना पत्र पाठवून यासंदर्भातील माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार, शासनाच्या वित्त विभागाच्या ९ मे २००३ च्या परिपत्रकाचा संदर्भ घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
या नियमानुसार, ज्या कर्मचाऱ्यांनी उन्हाळी किंवा इतर दीर्घ सुट्ट्यांच्या काळात कर्तव्य म्हणून शासनाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे किंवा ज्यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण अशा जनगणनेच्या कामासाठी करण्यात आली होती, तो संपूर्ण कालावधी ‘कर्तव्य काळ’ (On Duty) म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना या कालावधीसाठी देय असलेला प्रवास भत्ता व प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विहित नमुन्यात अहवाल
भत्त्याची रक्कम मे २०२६ च्या चालू वेतनासोबतच जमा व्हावी, याकरिता प्रशासनाने अत्यंत वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपापल्या गटातील पात्र प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, पदोन्नती मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांची यादी तयार करून ती एका विहित नमुन्यात आजच्या आज जिल्हा कार्यालयाकडे सादर करावी, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत.यासाठी शिक्षण विभागाने एक विवरणपत्र (Format) देखील जोडले आहे, ज्यामध्ये खालील माहिती भरणे अनिवार्य आहे.
तालुक्याचे नाव आणि शाळेचे नाव
संबंधित कर्मचाऱ्याचे नाव व त्याचे पदनाम
प्रशिक्षण किंवा जनगणनेच्या कामाचा नेमका कालावधी (कधीपासून कधीपर्यंत)
माहिती न दिल्यास विलंबन
हा सर्व डेटा वेळेत संकलित करून मे महिन्याच्या पे रोल (वेतन देयक) मध्ये समाविष्ट केला जाईल, जेणेकरून शिक्षकांना त्यांच्या हक्काचे पैसे विनाविलंब मिळतील. या पत्राची प्रत माहिती व पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडेही सविनय सादर करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे जिल्ह्यातील शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त केले जात असून, संबंधित यंत्रणा आता तातडीने माहिती गोळा करण्याच्या कामाला लागली आहे.
नेते म्हणतात
ग्रीष्मकालीन सुट्टी कालावधीत शिक्षकांकडे जनगणना आणि मतदार पडताळणी (SIR) काम असल्याने सुट्टी कालावधीत वाहतूक भत्ता संबंधित सर्व शिक्षकांना मिळायला पाहिजे. ९ मे २००३ च्या शासन पत्रातील उल्लेख स्वयंस्पष्ट आहे. नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षकांना वाहतूक भत्ता देऊ शकते तर अन्य जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला शासनाकडूनच निर्देशाची गरज का हे अनाकलनीय आहे.
विजय कोंबे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.
तर मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सतीश जगताप म्हणतात ही मदत देणारी नंदुरबार एकमेव जिल्हा परिषद. तहसीलदार निर्णय घेऊ शकतात तर अन्य का नाही.
