गडचिरोली : जिल्ह्यातील धान खरेदी, भरडाई, तांदूळ साठवणूक आणि राईस मिलिंग प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांबाबत काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी केलेल्या तक्रारी मागे घेतल्याचे पत्र समोर आल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, हे पत्रच बनावट असल्याचा दावा स्वतः पटोले यांनी केल्याने या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले असून एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार नाना पटोले यांचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना विनंती करणारे एक पत्र प्रसारित झाले होते. या पत्रात धान खरेदी व राईस मिलिंग संदर्भातील दोन गंभीर तक्रारी मागे घेत असल्याचे नमूद करण्यात आले होते. तक्रार करताना वस्तुस्थितीची पूर्ण माहिती नव्हती, ती आता समजल्याने तक्रारी मागे घेत असल्याचेही या पत्रात म्हटले होते. त्यामुळे धान घोटाळ्याबाबत सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे पटोले अचानक माघार का घेत आहेत, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले होते.

मात्र, या घडामोडीनंतर नाना पटोले यांनी संबंधित पत्राशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या नावाने प्रसारित करण्यात आलेले पत्र बनावट असून आपण कोणतीही तक्रार मागे घेतलेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पटोले यांनी यापूर्वी देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील गोदाम भाडेप्रकरण, धान भरडाई प्रक्रियेतील कथित अनियमितता, तांदूळ साठवणूक तसेच जय अंबे राईस मिलशी संबंधित गैरव्यवहारांबाबत गंभीर आरोप केले होते. या तक्रारींमध्ये शासनाची फसवणूक, धानाची अफरातफर आणि अधिकाऱ्यांशी संगनमताचे आरोप करण्यात आले होते. शासनानेही या तक्रारींची दखल घेत चौकशीची प्रक्रिया सुरू केली होती.

त्यामुळे आता तक्रारी मागे घेतल्याचे पत्रच बनावट असल्याचा दावा समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित पत्र कोणी तयार केले, ते कोणत्या माध्यमातून प्रसारित झाले आणि त्यामागचा उद्देश काय होता, याची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या नव्या घडामोडीमुळे धान घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. सोबतच हे पत्र पटोले यांना अंधारात ठेऊन त्यांच्या कार्यालयातूनच कुणीतरी पाठविल्याचा संशय असून यात घोटाळेबाज राईस मिल धारकांचाही हात असल्याची शंका आता व्यक्त होत आहे. त्यामुळे असे आणखी काही बनावट पत्र मंत्रालयात देण्यात आले काय, याचा देखील तपास होणे महत्त्वाचे झाले आहे.

माझ्या नावाने प्रसारित करण्यात आलेले पत्र पूर्णपणे बनावट आहे. मी धान खरेदी व राईस मिलिंग प्रकरणातील कोणतीही तक्रार मागे घेतलेली नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत असून संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात येईल. -नाना पटोले, आमदार