सिंदखेडराजा, जि. बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उघडपणे गुजरातबद्धल विशेष ममत्व दाखवून राज्याराज्यांत शत्रुत्वाच्या भिंती उभे करीत असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपच्या ‘अब की बार चारसो पार’ घोषणेची खिल्ली उडवून ‘अब की बार भाजप तडीपार’ असा नारा दिला. देशात रशिया सारखी निरंकुश हुकूमशाही आणू इच्छिणाऱ्या भाजपचे मनसुबे लोकसभा निवडणुकीत उध्वस्त करून महाराष्ट्रातील गद्दारांना जमिनीत गाडण्याचे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा >>> “एकाही वरिष्ठ नेत्याने वर्धेची जागा काँग्रेसने लढावी म्हणून स्वारस्य दाखविले नाही,” कोण म्हणाले असे पक्षाध्यक्ष खर्गे यांच्यासमोर?

सिंदखेडराजा येथे आज बुधवारी रणरणत्या उन्हात जनसंवाद सभा पार पडली. यावेळी जिजामातेच्या माहेरातून त्यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आमदार नितीन देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेच्या गद्द्रारांवार टीकेची तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना केवळ आणि केवळ गुजरात बद्दल ममत्व का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आताही सेमिकंडक्टरचे देशात येऊ घातलेले दोन प्रकल्प पुन्हा गुजरातला नेल्याचा गौप्यस्फोट ठाकरेंनी केला. हे पक्ष महाराष्ट्र तर सोडा, पण उत्तरप्रदेश, उत्तराखंडला का नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. भाजप म्हणजे भाडोत्री जनता पार्टी आहे. भाजपने यंदा ‘अब की बार चारसो पार’ असा नारा दिला आहे. मात्र, हे अशक्य असून जनतेने देशावरील हुकूमशाहीचा धोका वेळीच ओळखून अशा प्रवृत्तीला ठेचणे काळाची गरज असल्याचे ठाकरे म्हणाले. जनता हे करणारच असून यंदा देशात परिवर्तन अटळ असल्याचे भाकित करून ‘अबकी बार भाजपा तडीपार’ असा नारा त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिला. 

हेही वाचा >>> वस्तीगृहात २४० निवासी विद्यार्थी दाखवा अन लाखाचे बक्षीस मिळवा; उपोषणकर्त्यांचे थेट संचालकांनाच आव्हान…

शिवरायांच्या राज्यात अजूनही गद्दारांना थारा नाही हे जनता दाखवून देणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचा आत्मविश्वास ठाकरेंनी बोलून दाखविला. महाराष्ट्रात शिवरायांचा जन्म झाला. औरंगजेबचा जन्म गुजरात मधील दाहोद येथे झाल्याचे सांगून यामुळे मोदी, शहा यांच्यात औरंगजेबी वृत्ती आहे. त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे, मुंबई विकायची आहे अन मराठी माणूस संपावायचा आहे. मात्र, या कारस्थानात बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव ठाकरे आड येतात. यामुळे त्यांनी सेनेचे दोन तुकडे केले. यामुळे समाधान न झाल्याने राष्ट्रवादी फोडली, काँगेसचे चव्हाण यांना घेऊन गेले. ते कचऱ्याची गाडी घेऊन फिरताहेत, इकडून तिकडून ‘कचरा’ जमा करताहेत. मात्र, त्याचा काडीमात्र फायदा होणार नाही. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (मोदींना) कचऱ्याची टोपली दाखवीत असताना केवळ बाळासाहेब ठाकरे त्यांच्या बाजूने उभे ठाकल्याने ते बचावले. मात्र, आज ते त्याच शिवसेनेला संपवायचा प्रयत्न करताहेत. मात्र मर्द मावळ्यांची, वाघांची सेना सहजासहजी संपणार नाही, असा विश्वास ठाकरे यांनी बोलून दाखविला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईडी, सीबीआय भाई-भाई ईडी, सीबीआय, आयकर हे आता त्यांच्यासाठी भाई मंडळी झाली आहे. ते (या संस्था) ‘भाई’ पण आहे अन घरगडी सुद्धा असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. अंबादास दानवे, संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या भूमीत गद्दारांना माफी नसल्याचे सांगितले. यावेळी नरेंद्र खेडेकर व जालिंदर बुधवत यांचेही यावेळी भाषण दिले.