नागपूर: देशातील आर्थिक आव्हाने, वाढती आयात आणि परकीय चलन साठ्याचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना काटकसरीचे आवाहने केले आहे。यात प्रामुख्याने परदेश प्रवास टाळणे, सोने खरेदीत कपात, इंधन व खाद्यतेलाची बचत करणे आणि स्वदेशी उत्पादनांचा वापर करणे आदींचा समावेश आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-२’ चा समारोप सोहळा गुरुवार ४ जून रोजी नागपूर येथील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात होणार आहे. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. युद्धजन्य परिस्थिती, वाढती महागाई, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले आवाहन, पेपरफुटी आणि देशातील इतर परिस्थितीवर भागवत काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाषण महत्त्वाचे का आहे?

संघामध्ये विजयादशमी उत्सव आणि कार्यकर्ता विकास वर्ग हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम असतात. या दोन्ही कार्यक्रमात सरसंघचालकांचे भाषण अत्यंत महत्त्वाचे असते. यावेळी ते देश आणि विदेशातील सामाजिक, राजकीय आणि अन्य परिस्थितीवरही भाष्य करतात. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या समारोपीय सोहळ्यात भागवत कुठल्या विषयांना स्पर्श करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संघाने शताब्दी वर्षानिमित्त पंचपरिवर्तन उपक्रम हाती घेतले आहे. त्यामुळे सरसंघचालकांच्या भाषणात याचाही उल्लेख होण्याची शक्यता आहे. याशिवाय अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसर करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सरसंघचालक या मुद्यांना स्पर्श करण्याची शक्यता आहे. तसेच ते जनतेला काय आवाहन करतात हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

पद्मभूषण कुमारमंगलम बिर्ला मुख्य अतिथी

या कार्यक्रमासाठी आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आणि पद्मभूषण उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘कार्यकर्ता विकास वर्ग-२’ ११ मे पासून नागपूर येथे सुरू आहे. देशभरातील विविध प्रांतांमधून निवडलेले ८८० स्वयंसेवक या २५ दिवसांच्या सखोल प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले आहेत. स्वयंसेवकांना वैचारिक, शारीरिक आणि संघटनात्मक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्व क्षमता, शिस्त आणि संघटन कौशल्य विकसित करणे हा या वर्गाचा मुख्य उद्देश आहे, असे संघाकडून सांगण्यात आले. या समारोप सोहळ्याला पद्मश्री भारतभूषण त्यागी, योगी भवननाथ महाराज, महाराजा गज सिंह, गोपाळभाई मावजी गोरसिया, दिव्यम त्रिपाठी, गोविंद मावजी गोरसिया आणि भार्गवभाई सुथार उपस्थित राहणार आहेत.