वर्धा : भारतातून कधीकाळी नामशेष झालेल्या चित्त्यास उजाळा मिळाला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून, असे सांगितल्या गेले होते.१७ सप्टेंबर २०२२ रोजी ८ चित्ते नामीबिया येथून आणल्या गेले. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवशी स्वतः त्यांनी यश कुनोत सोडले. नंतर फेब्रुवारी २०२३ साली दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते आणल्या गेलेत. आता या वर्षी त्यांची संख्या ५६ वर पोहचली आहे. म्हणजेच हा प्रकल्प यशस्वी ठरला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक सेवेच्या प्रदीर्घ प्रवासात वन्यजीव संगोपण हा महत्वाचा पैलू ठरला. डी डी न्यूजने ही बाब अधोरेखित करीत त्यास ऐतिहासिक संबोधले आहे.

नैसर्गिक वारसा जतन

देशाच्या विकासासोबतच भारताच्या नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन हा अत्यंत महत्त्वाचा आणि केंद्रस्थानी राहिलेला विषय ठरला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा २५ वर्षांचा हा प्रवास केवळ राजकीय किंवा प्रशासकीय निर्णयांपुरता मर्यादित राहला नाही. तर वन्यजीव संरक्षण आणि जैवविविधतेच्या जतनात भारताला जागतिक पटलावर अग्रस्थानी नेणारा ठरला आहे.

‘गिर’च्या सिंहांपासून प्रवास

गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी ‘गिर’ अभयारण्यातील आशियाई सिंहांच्या संवर्धनासाठी आखलेली धोरणे अत्यंत यशस्वी ठरली. स्थानिक समुदायाला आणि प्रशासनाला सोबत घेऊन वन्यजीव रक्षणाचा एक शाश्वत मार्ग त्यांनी तयार केला, ज्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या आशियाई सिंहांच्या संख्येत वेगाने वाढ झाली. निसर्ग आणि मानवी जीवनाचा सहसंबंध जपत वन्यजीव संरक्षण कसे करता येते, याचा एक आदर्श नमुना त्यांनी गुजरातमध्ये निर्माण केला.

प्रोजेक्ट चित्ता आणि..

पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत वन्यजीव संरक्षणाला व्यापक आणि आंतरराष्ट्रीय परिमाण मिळाले. गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने वन्यजीव संरक्षणासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. यामध्ये ‘प्रोजेक्ट लायन’, ‘प्रोजेक्ट टायगर’ चे सक्षमीकरण आणि भारतात सात दशकांनंतर चित्त्यांचे पुनरागमन घडवून आणणारा ऐतिहासिक ‘प्रोजेक्ट चित्ता’ यांचा समावेश आहे. केवळ देशांतर्गत पातळीवर न थांबता, भारताच्या पुढाकाराने ‘इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स’ (IBCA) ची स्थापना करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय आघाडीद्वारे जगभरातील ‘बिग कॅट्स’ प्रजातींच्या संरक्षणासाठी भारताने जागतिक नेतृत्वाची धुरा सांभाळली असून, जागतिक वन्यजीव संवर्धनात भारताची भूमिका निर्णायक ठरत आहे.

पर्यावरण आणि विकासाचा समतोल

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आर्थिक विकास आणि निसर्गप्रेम या दोन घटकांचा उत्तम समतोल साधला. भारताचा हा वन्यजीव संवर्धनाचा प्रवास जगासाठी एक दिशादर्शक वस्तुपाठ म्हटल्या जातो. नैसर्गिक वारशाचे जतन हाच समृद्ध भविष्याचा पाया आहे, हा संदेश या २५ वर्षांच्या प्रवासातून स्पष्टपणे समोर येतो.