नागपूर : कुख्यात गुन्हेगार नीलेश मेश्राम हा तलवार घेऊन साथीदारांसह मंगळवारी रात्री आमच्या घरात शिरला. आम्हाला जीवे मारण्याची धमकी देऊन दार उघडण्यासाठी दबाव टाकला.  त्याच्या हातातील शस्त्र बघून आम्ही घाबरलो. त्यामुळे आम्ही दार उघडले नाही. नीलेश आणि त्याच्या साथीदाराने घरावर दगडफेक केली. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच घरासमोर उभी असलेली दुचाकी फोडली. आम्ही दरवाजा उघडला नाही, म्हणून आमचा जीव वाचला. याबाबत आम्ही इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. परंतु पोलिसांनी गांभीर्य दाखवून कारवाई केली नाही. माझ्या वडिलाचा खून इमामवाडा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच झाला असून ठाणेदारसह पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी मृत नरेश वालदे यांच्या मुलीने केली आहे.

इमामवाडाच्या जाटतरोडी परिसरात पोलीस चौकीसमोरच बुधवारी दिवसाढवळ्या नरेश वालदे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी नीलेश उर्फ नाना विनोद मेश्राम (२८), ईश्वर उर्फ जॅकी राजेश सोमकुवर (२५) आणि अक्षय दीपक सावळे (३०) तिन्ही रा. रामबाग यांना अटक केली होती. 

नरेश वालदे यांच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, नीलेश हा कुख्यात गुन्हेगार असून यापूर्वी हत्याकांडात कारागृहात गेलेला आहे. त्याला माझ्यासोबत मैत्री करायची होती, परंतु मी त्याला नकार दिला. त्यामुळे तो माझ्यावर चिडून होता. ‘तू माझ्यासोबत मैत्री न केल्यास मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारेल,’ अशी मला अनेकदा धमकी दिली. परंतु मी त्याच्या धमकीला भीक घातली नाही. त्यामुळे त्याने वचपा काढण्यासाठी मंगळवारी रात्री साथीदारांसह माझ्या घरात प्रवेश केला. ‘दरवाजा उघड, तुम्हा सर्वांना आज संपवूनच टाकतो’ अशी धमकी दिली.  आम्ही दरवाजा उघडला नाही. त्याने घरावर दगडफेक केली.

 दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तसेच बाहेर ठेवलेली आमची गाडी सुद्धा फोडली. या घटनेनंतर माझ्या वडिलांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात नीलेश विरुद्ध तक्रार दिली. मात्र ठाणेदार आणि पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच नीलेशची हिंमत वाढली. बुधवारी दुपारी  जाततरोडी पोलीस चौकीच्या अगदी हाकेच्या अंतरावर माझ्या वडिलांचा भर चौकात खून केला. ठाणेदार आणि चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच माझ्या वडिलांचा खून झाला. त्यामुळे यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी यावेळेस नरेश वालदे यांच्या मुलीने केली.

ऑटो आणि शस्त्र जप्त

नीलेश सराईत गुन्हेगार आहे. कमितकमी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई तर करताच आली असती. बुधवारी दुपारी वालदे जाटतरोडी पोलीस चौकीजवळील पानटपरीवर बसलेले होते. या दरम्यान नीलेश आणि त्याच्या साथीदारांनी मिळून त्यांचा खून केला. गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासातच तिन्ही आरोपींना मौदा परिसरातून अटक केली. आरोपी ऑटोत बसून शहरातून बाहेर फरार होण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी ऑटो आणि खुनासाठी वापरलेले शस्त्र जप्त केले आहेत. न्यायालयाने त्यांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

इंस्टाग्रामवर  स्टेट्स

नीलेश आक्रमक स्वभावाचा आहे.  खून केल्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर तरुणीसोबतचा एक फोटो शेअर केला. त्यावर त्याने ‘बघ न बेबी मी काय केले?’ असे लिहिले होते.   गुंडाकडून खुनासारखा गंभीर गुन्हा झाल्यानंतर इंस्टावर पोस्ट टाकणे अनेक प्रश्न निर्माण करीत आहे.  गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही, का असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.