अकोला : सातपुडा पर्वत रांगेतील पावसाळ्यातील हिरवाई आणि धबधब्यांचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करीत असते. सातपुडाच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक नरनाळा किल्ल्याचे सौंदर्य पर्यटकांना खुणावतंय! पावसाळी पर्यटनासाठी नरनाळा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरले. जंगल सफारी, बोटिंग, ट्रेकिंग, सुळई धबधबा, व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंग अशा विविध उपक्रमांमुळे पर्यटकांची पावले नरनाळाकडे वळत आहेत.

ऐतिहासिक किल्ल्याने वेधले पर्यटकांचे लक्ष

सातपुडा पर्वत रांगेतील सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. नरनाळा किल्ला पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार १६१ फूट उंचीवर असलेल्या नरनाळा किल्ल्याचे क्षेत्रफळ ३९२ एकर असून, किल्ला सुमारे २४ मैल (३८.५ किमी) लांब आहे. किल्ल्यात २२ तलाव, २२ दरवाजे आणि सुमारे ३६० बुरुज आहेत. महाकाली दरवाजा, जाफराबाद व तेलियागड यासह ऐतिहासिक वास्तू पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात.

पर्यटकांच्या भेटीचा चढता आलेख

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागाकडून पर्यटकांसाठी नरनाळा किल्ला जंगल सफारी संचालित केली जाते. ऑक्टोबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत एक हजार ६२३ जिप्सीतून नऊ हजार १२ पर्यटकांनी सफारी केली. ऑक्टोबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत दोन हजार ७६२ जिप्सीतून तब्बल १५ हजार ४८७ पर्यटकांनी सफारीचा आनंद घेतला. गतवर्षाच्या तुलनेत पर्यटकांची संख्या वाढली.

साहसी खेळांसाठी परवानगी; पर्यटकांना बोटिंगचा आनंद

पावसाळ्याच्या कालावधीत पर्यटन उपक्रमांवर काही निर्बंध असले तरी १५ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान पर्यटकांना कुठर परिसरातील ट्रेकिंग व सुळई धबधबा येथे जाण्याची संधी मिळते. तसेच सुळई नाला परिसरात साहसी खेळांसाठी परवानगी दिली जाते. नरनाळा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोपटखेड धरण येथे बोटिंगची सुविधा सुरू झाली. स्थानिक युवकांना वनविभागामार्फत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला. फेब्रुवारीपासून आतापर्यंत सात हजार ११० पर्यटकांनी बोटिंगचा आनंद घेतला.

स्थानिक संस्कृती, पर्यटनातून रोजगारनिर्मिती

पर्यटकांच्या सोयीसाठी शहानूर संकुल येथे विविध सुविधा उपलब्ध आहेत. स्थानिक संस्कृती, पर्यटनाला चालना मिळत असून, वाढत्या पर्यटक संख्येमुळे परिसरातील स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्याचा दावा अकोट वन्यजीव विभागाने केला.

पावसाळी पर्यटनात सुरक्षेची काळजी आवश्यक

पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षेची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. सहलीचे नियोजन करताना केवळ सौंदर्य नव्हे, तर सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी यांनी व्यक्त केले. सातपुडा पर्वत रांगेतील नरनाळा किल्ला व परिसरात अद्भूत निसर्ग सौंदर्य असून पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची गरज आहे, असे पर्यवरणप्रेमी महेंद्र तरडेजा यांनी सांगितले.