अकोला : विजेने मानवी जीवन सहज आणि सुसह्य केले. विजेशिवाय जगण्याची कल्पनाच करता येत नाही.

घरापर्यंत वीज पोहोचवण्यासाठी मोठी यंत्रणा निरंतर कार्यरत असते. २४ तास अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी रात्रंदिवस धडपड करणारी माणसे म्हणजे महावितरणचे लाईनमन. महाराष्ट्रातील १२ लाख कि.मी.वरील वीज वाहिन्यांची देखरेख करणारे लाईनमनचे कार्य मोठे आव्हानात्मक आहे.

लाईनमनच्या कामाची दखल घेत देशभरातील लाईनमन बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र शासनाने ४ मार्च हा ‘लाईनमन दिवस ‘ साजरा करण्याच्या सुचना सर्व सार्वजनिक आणि खासगी आस्थापनांना दिल्या आहेत.

महावितरणकडून हा दिवस साजरा केला जातो.
महावितरणचे सुमारे ८३ हजार कर्मचारी, रक्तवाहिन्याप्रमाणे पसरलेल्या १२ लाख किलोमीटरच्या वीज वाहिन्या, ४ हजार २६७ उपकेंद्रे, तसेच ९ लाख ८२ हजार रोहित्राच्या माध्यमातून ३० हजार मेगावॅट वीजही मुंबईचा काही भाग वगळता राज्यातील विविध वर्गवारीतील ३ कोटी १३ लाख ग्राहकांपर्यंत अखंड पोहोचवण्याच काम महावितरणचा लाईनमन अविरत करत असतो, असे महावितरणच्या अकोला परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड यांनी सांगितले. वीजपुरवठा खंडित झाला की सर्वकाही ठप्प होते. गेलेली वीज परत कशी आली, हे कोणी कधी जाणून घेत नाही किंवा तशी गरजही वाटत नाही. त्यामुळे महावितरणचा लाईनमन आजवर दुर्लक्षित घटकच राहिला.

वीज यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी यंत्र नव्हे तर मानवच

बंद पडलेली वीज यंत्रणा पुर्ववत करण्यासाठी यंत्र नव्हे तर प्रत्यक्ष माणुसच लागतो. त्यामु़ळे ठप्प झालेली किंवा रात्री-बेरात्री खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत होतो. त्याठिकाणी महावितरणचा लाईनमन प्रसंगी प्रतिकूल आणि धोकादायक परिस्थितीत खांबावर, रोहित्रावर चढून काम करतो असतो. खंडित झालेली वीज सुरळीत होते.

वीज यंत्रणेत काम करण्याचा कितीही वर्षांचा अनुभव असला तरी विजेशी मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या क्षणी अनावधानाने झालेली चूकही जीवावर बेतू शकते. महावितरणची उघड्यावर असलेली संपूर्ण यंत्रणा, जंगल, दरी-खोऱ्यातून आलेल्या वीज वाहिन्या, वीज खांबे, रोहित्रे आदीवर उन्ह, वादळ-वारा,पाऊस याचा मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे वीज यंत्रणेची नियमित देखभाल-दुरूस्ती करतांना किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर प्रसंगी एखादा बिघाड शोधण्यासाठी शेकडो किलोमीटर वीज वाहिन्यांचे ‘पेट्रोलिंग’ करावे लागते.

पावसाळ्यात तर अशा आव्हानांची नियमितपणे भर पडत असते. सण-उत्सवाच्या काळात महावितरणचा लाईनमन अंधाराचे सावट पडू नये म्हणून अखंडित विजेसाठी आपल्या कर्तव्यावर कार्यरत असतो. एवढेच काय तर करोना सारख्या महामारीने संपूर्ण जगाला कुलूपबंद केले होते. परंतु अत्यावश्यक सेवा असल्याने लाईनमनने जीवाची पर्वा न करता चोखपणे या काळात रात्र-दिवस अखंडित सेवा देण्याचे कार्य केले. एकेकाळी फक्त पुरूषप्रधान असलेल्या या क्षेत्रात “लाईन वुमनही” पुरूषांच्या खांद्याला खांदा लाऊन सक्षमपणे या क्षेत्रातील आपले कर्तव्य बजावत आहेत.