नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता येथे डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या पार्श्वभूमीवर महिलांवरील गुन्ह्यांबाबत वक्तव्य केले. राष्ट्रपती यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये देशात महिलांवरील अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली. ‘आता पुरे झाले’, असा संताप व्यक्त करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताने महिलांवरील गुन्ह्यांच्या विकृतीबद्दल जागृत होण्याची आणि महिलांना कमी सामर्थ्यवान, कमी सक्षम, कमी हुशार समजणाऱ्या मानसिकतेचा प्रतिकार करण्याची वेळ आली आहे, असे विधान केले होते. काँग्रेसने या वक्तव्याचे स्वागत केले आहे.या वक्तव्याबाबत महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अल्का लांबा यांनी टिप्पणी केली आहे.
नारी न्याय आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्या गुरुवारी नागपूर आल्या असता आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महिलांवरील अत्याचार आणि महिला सक्षमीकरणाबाबत केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणावर टीका केली. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी देखील देशातील घटनांमुळे भयकंपित झाल्याचे म्हटले आहे. पण यास थोडा विलंब झाला आहे. मणिपूर अजूनही जळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजूनही तेथे लक्ष घातलेले नाही. तेथे एका सैनिकाच्या पत्नीवर अत्याचार झाला. या सैन्यदलाचे सुप्रीम कमांडर राष्ट्रपती आहेत. मणिपूरच्या तत्कालिन महिला राज्यपाल यांनी राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्र लिहून कळवले होते. तसेच भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांना भेटीची वेळतर दिली गेली नाहीच पण त्यांना त्या पदावरून काढून टाकण्यात आले. क्रीडापटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी भेटीची वेळ मागितली.
हेही वाचा…एमपीएससीच्या समाजकल्याण परीक्षेबाबत मोठी अपडेट; या तारखेपर्यंत हरकती….
पण त्यांनाही राष्ट्रपती महोदयांनी वेळ दिली नाही. माफ करा राष्ट्रपती महोदयजी भाजपच्या चष्म्यातून देशाला बघणे बंद करा, तुम्ही देशाच्या राष्ट्रपती आहात. देशातील प्रत्येक मुलगी तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा करते, असे अल्का लांबा म्हणाल्या.
दरम्यान, काँग्रेसने संपूर्ण देश संतापला आहे. त्यामुळे राष्ट्रपती ज्या संतापाची भावना व्यक्त करत आहेत, त्याचे प्रतिनिधित्व करणे स्वाभाविक आहे. परंतु देशाचा आक्रोश हा केवळ कोलकात्याच्या घटनेबद्दल असू नये, तर तो मणिपूर, कोल्हापूर, बदलापूर अशा अनेक घटनांबाबत देखील असावा. भाजपशासित प्रदेशातील महिलांवरील अत्याचाराबाबत राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला उपाययोजना करण्याची सूचना करावी. भाजपच्या कार्यकाळात देशात महिलांवरील अन्याय, अत्याचार वाढले असून भयावह स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रपतींनी कोलकाता घटनेचा संदर्भात हे वक्तव्य केले. इतर राज्यात घडलेल्या घटनांबाबत भाष्य करण्याचे टाळले, असेही त्या म्हणाल्या.