वर्धा : शेतकरी हा एक स्वतंत्र विषय. त्याचे प्रतिबिंब प्रचलित साहित्य संमेलनात कधीच उमटले नाही, अशी खंत शेतकरी नेते व्यक्त करतात. समाजातील हा एक मोठा आधार असलेल्या शेतकऱ्यांचे  वास्तव पुढे आले पाहिजे म्हणून शेतकरी साहित्य संमेलन ही संकल्पना पुढे आली आणि ती यशस्वी पण ठरली. विविध ठिकाणी १३ अशी संमेलने भरली. आता १४ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे आयोजित होणार आहे.

लातूर येथील ज्येष्ठ शेतीसाहित्य अभ्यासक तथा समीक्षक मा. प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र, अनर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाविषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषि उद्योगीजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून हे संमेलन होत असते, अशी भूमिका कार्याध्यक्ष गंगाधर मुटे मांडतात.दि. २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, प्रतापगड परीसर, महाबळेश्वर, जि. सातारा येथे दोन दिवसीय १४ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

शेती मध्यवर्ती विषय मानून शेतीसाहित्याची गुंफण करणारी साहित्यनिर्मिती व्हावी, हा उद्देश.  नैसर्गिक सृजनशील अनुभूति सृजकांना व्हावी म्हणून यंदाचे १४ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आले.असून संमेलनाचे उदघाटक महाबळेश्वरचे शेतकरी  किसन शेठ भिलारे हे राहणार. ज्येष्ठ साहित्यिका आणि उद्योजिका  चंद्रलेखा बेलसरे यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाली असून इंडियाना सुक्रो टेक पुणे प्रा. लि. चे संचालक मा. प्रमोदकुमार बेलसरे यांची संयोजक म्हणून निवड झाली आहे.मुंबई हायकोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ मा. अ‍ॅड सतीश बोरुळकर यांची आयोजक म्हणून निवड करण्यात आलेली आहे.

संमेलनाच्या आयोजनाकरिता विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून दिलीप भोयर (अमरावती) प्रतिभा काळे, सचिव, शेती अर्थ प्रबोधिनी (वर्धा), राजेंद्र फंड (अहिल्यानगर).  विनोद काळे, शिवम मुटे (वर्धा) गणेश मुटे (वर्धा), सारंग दरणे, विवेक मुटे (वर्धा) यांची निवड करण्यात आलेली आहे. मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरूप धारण केले.कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशा अस्मानी संकटामुळे उत्पादनात येणारी प्रचंड घट, शेतमालाच्या पडत्या बाजारभावामुळे व वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे डबघाईस आलेले शेतीचे अर्थशास्त्र, मागील पाच वर्षांपासून सततची नापिकी, विजेचे बिल देखीलभरण्याची शेतकऱ्यांची ऐपत उरलेली नाही. निर्विकारपणे शेतीव्यवसायाकडे बघण्याची शासकीय व प्रशासकीय यंत्रणेची मानसिकता तयार झाली आहे.त्यामुळे प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फ़ारसा उहापोह होतांना दिसत नाही. राजकीय आणि शासकीय आघाड्यावर शेतीला आधार देणाऱ्या उपाययोजना शोधण्याऐवजी शेतकर्‍यांना थातुर-मातुर अनुदानाच्या योजनांचे गाजर दाखवून बोळवण केल्या जात आहे.

समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात सुद्धा यापेक्षा वेगळी स्थिती नाही. शेतकऱ्याची मुले शिक्षण घेऊन अन्य व्यवसायात गेली.  शेतीच्या वास्तवतेवर सर्वकष प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतीच्या दुर्दशेच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची चाचपणी करून जाणिवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्यविश्वात आजही उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्यक्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे.

साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे संपन्न झाले. त्यानंतर नागपूर,  गडचिरोली, मुंबई,  पैठण (औरंगाबाद),  अलिबाग (रायगड) येथे तर कोरोना आपत्तीमुळे ७ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन ऑनलाईन पद्धतिने शेतकरी साहित्य संमेलन रावेरी (यवतमाळ) येथे पार पडले. ऑनलाईन संमेलन  गुरुकुंज आश्रम (अमरावती) येथे झाले. तसेच  मोहाडी (नाशिक),  जयसिंगपूर (कोल्हापूर)ला झाले.

१४ व्या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित राहणार नाही. साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि सशक्त लेखणीच्या माध्यमातून इंडियाच्या बरोबरीने भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी हातात लेखणी घेऊन लढणाऱ्या लढवैया सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे, असे सांगण्यात आले.

या संमेलनात उदघाटन सत्र, शेतकरी कवी संमेलन, शेतकरी गझल मुशायरा, परिसंवाद, कथाकथन असे सत्र असणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत. तरी सर्व शेतीप्रेमी साहित्यिक आणि रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.