वर्धा : देशातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात लवकरच एक अतिशय मोठा आणि ऐतिहासिक बदल पाहायला मिळणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) ने एक अतिशय मोठा निर्णय घेत वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणात मोठे फेरबदल करण्याची घोषणा केली आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले काही कोर्सेस लवकरच इतिहासजमा होणार आहेत. पण हे नेमके कोणते कोर्सेस आहेत आणि विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम होईल, हे बघा.

NMC अधिसूचना अशी

नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे की, देशातील सर्व ‘पोस्ट ग्रॅज्युएट (PG) डिप्लोमा’ (Postgraduate Diploma Medical Courses) अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने बंद केले जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ हे या पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे शेवटचे वर्ष असेल. म्हणजेच २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून देशात कोणत्याही पीजी डिप्लोमा कोर्सला प्रवेश दिला जाणार नाही आणि त्यानंतर हे कोर्सेस पूर्णपणे बंद होतील.जर पीजी डिप्लोमा कोर्सेस बंद झाले, तर जे विद्यार्थी स्पेशलायझेशन (विशेषीकरण) करू इच्छितात त्यांच्यासाठी कोणता पर्याय असेल? हा प्रश्न आहे.

नॅशनल मेडिकल कमिशनचा तोडगा

वैद्यकीय आयोगाने यावरअत्यंत सकारात्मक तोडगा काढत स्पष्ट केले आहे की, हे सर्व पीजी डिप्लोमा कोर्सेस टप्प्याटप्प्याने थेट पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये, म्हणजेच ‘MD’ (Doctor of Medicine) आणि ‘MS’ (Master of Surgery) मध्ये रूपांतरित केले जातील. याचाच अर्थ असा की, वैद्यकीय विद्यार्थ्यांना आता केवळ ‘डिप्लोमा’ धारक राहण्याऐवजी, थेट उच्च दर्जाची ‘डिग्री’ (Degree) मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

वैद्यकीय शिक्षणाचे धोरण ठरवणाऱ्या समितीने या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते, वैद्यकीय शिक्षणाचे जागतिक स्तरावर मानकीकरण करणे, विशेषज्ञ प्रशिक्षणाचा दर्जा वाढवणे आणि सध्याच्या संस्थात्मक क्षमतेचा (इन्फ्रास्ट्रक्चर) पुरेपूर वापर करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. NMC च्या असे निदर्शनास आले होते की, अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकाच विषयात पीजी डिप्लोमा आणि पीजी पदवी (MD/MS) असे दोन्ही अभ्यासक्रम एकाच वेळी चालवले जात आहेत. तर काही महाविद्यालयांकडे आवश्यक पायाभूत सुविधा, तज्ज्ञ प्राध्यापक आणि क्लिनिकल साहित्य उपलब्ध असूनही ते केवळ ‘डिप्लोमा’ कोर्सेस चालवत आहेत.

असे आहेत निर्देश

या महत्त्वाच्या बदलाची अंमलबजावणी करण्यासाठी NMC ने सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांना तातडीने निर्देश दिले आहेत. ज्या महाविद्यालयांमध्ये सध्या पीजी डिप्लोमा कोर्सेस सुरू आहेत आणि ज्यांना ते अभ्यासक्रम MD किंवा MS पदवीमध्ये रूपांतरित करायचे आहेत, त्यांनी ‘मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्ड’ (MARB) कडे ऑनलाईन पोर्टलद्वारे विहित नमुन्यात लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणतात.

हा बदल स्वागतार्ह आहे, असे मत सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले. ते म्हणतात की मी MCI च्या पी. जी. म्हणजेच पदव्युत्तर समितीचा अध्यक्ष असतांना या बदलाचे सुतोवाच केले होते. तेव्हा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया व आता National Medical Commission असलेल्या संस्थेने हा निर्णय घेतला. त्यावेळी cut off तारीख दिली नव्हती. आता ती निश्चित करण्यात आली आहे. आता केवळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालू राहतील. पदव्युत्तर पदविका म्हणजे डिप्लोमा अभ्यासक्रम राहणार नाही.