नागपूर : वाघांच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा आधार वाढत असताना जंगलातील प्रत्यक्ष गस्तीवरचा भर कमी झाला आणि त्याची किंमत वाघांच्या वाढत्या मृत्यूंमधून मोजावी लागत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, यंदा अवघ्या नऊ महिन्यांत देशात १३४ वाघांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मध्य प्रदेशात ४४ तर महाराष्ट्रात २७ वाघांचा समावेश आहे.
जंगलातील गस्तीकडे डोळेझाक
गेल्या संपूर्ण वर्षात देशात १७४ वाघांचा मृत्यू झाला होता. वर्ष संपण्यास तीन महिने बाकी असतानाच यंदाची संख्या त्या आकड्याच्या जवळ पोहोचली आहे. कॅमेरा ट्रॅप, जीपीएस, ड्रोन आणि डिजिटल मॉनिटरिंगच्या माध्यमातून जंगलावर नजर ठेवली जात असली तरी या यंत्रणा प्रत्यक्ष गस्तीची जागा घेऊ शकत नाहीत, हे पुन्हा एकदा वाघांच्या वाढत्या मृत्यूच्या आकडेवारीने स्पष्ट झाले. रात्रीच्या वेळी जंगलात गस्त, संवेदनशील भागांची तपासणी, संशयास्पद हालचालींचा माग आणि शिकारींच्या टोळ्यांवर नजर यासाठी वनकर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनीही अधूनमधून गस्तीत सहभागी होणे अपेक्षित आहे.
वाघाच्या मृत्यूची जबाबदारी कुणाची?
अलीकडच्या काळात अनेक शिकारी टोळ्या पकडल्यानंतर त्यांच्या चौकशीत वाघांच्या शिकारीचे धागेदोरे समोर आले. या टोळ्या सक्रिय होण्यापूर्वीच त्यांची माहिती वनविभागाला का मिळाली नाही, हा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे. जंगलातील गस्त आणि गुप्त माहिती यंत्रणेची भूमिका येथे महत्त्वाची ठरते. वाघाच्या मृत्यूनंतर आपसी लढाई, नैसर्गिक कारणे किंवा वृद्धत्व यापैकी एखादे कारण पुढे करून प्रकरण निकाली काढण्याची प्रवृत्तीही वाढली आहे. यापूर्वी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून वाघाच्या मृत्यूनंतर राज्याच्या वरिष्ठ पातळीवर प्रश्न उपस्थित करून जबाबदारी निश्चित केली जात होती. आता मात्र मृत्यूच्या प्रत्येक घटनेची तितक्याच गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची स्थिती आहे.
ज्येष्ठ अभ्यासक अजय दुबे म्हणतात…
वाघांची संख्या वाढणे ही संवर्धनासाठी महत्त्वाची उपलब्धी असली तरी केवळ संख्यावाढीवर समाधान मानून चालणार नाही. वाढत्या मृत्यूंची कारणे, शिकारीचे जाळे आणि संरक्षणातील त्रुटी यांचीही तितक्याच कठोरपणे दखल घ्यावी लागेल. तंत्रज्ञानावर सर्व काही सोपवून मोकळे होणे ही खूप मोठी चूक ठरत आहे. वाढत्या वाघांच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञान पुरेसे नाही. त्यासाठी गस्तच हवी आणि तीच केली जात नाही. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीतही तफावत आहे. मध्य प्रदेशात प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर ४४ हा आकडा दाखवत असला तरी प्रत्यक्षात ही संख्या ५६ वर गेली आहे. त्यामुळे हे मृत्यू गांभीर्याने घेतले नाही तर ही आकडेवारी पुन्हा वाढणार हे निश्चित आहे.
