अमरावती : मेळघाटातील डोंगरदऱ्यांमध्ये लपलेली निसर्गरम्य ठिकाणे आहेत. दैनंदिन जीवनाच्या धावपळीपासून दूर राहता येईल, अशा निवांत जागा आहेत. पण, या ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्ग नाहीत. यावर आता जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
मेळघाटमध्ये निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यामुळे याठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांशिवाय त्यांना जंगलातील भ्रमंती आणि निसर्गाशी एकरूप होण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी ट्रॅक आणि ट्रेलसाठी मार्ग शोधण्यात येतील, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे म्हणणे आहे.
मेळघाटातील पर्यटनाबाबत मेळघाट ॲडव्हेंचर क्लबने जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण केले. विदर्भातील वन पर्यटनामध्ये मेळघाट हा उत्तम पर्याय आहे. याठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटनस्थळांच्या विकासासोबतच पर्यटनाचे विविध पर्याय देणे आवश्यक आहे. यासाठी वन विभागाने पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन ट्रेकिंगसाठी मार्ग निवडावेत. आवश्यकता पडल्यास याठिकाणी स्वतंत्र द्वार उभारण्यात यावे. याप्रकारचे पर्याय दिल्यास पर्यटक मेळघाटात थांबण्यास तयार होतील.
पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक
मेळघाटातील पर्यटनाबाबत युवकांवर लक्ष ठेऊन त्यांच्यामार्फत समाजमाध्यमांवरून प्रसिद्धी करावी. यामुळे मेळघाटबाबत माहिती होण्यास मदत मिळणार आहे. शालेय विद्यार्थी आणि समूहाने येणारे पर्यटकांवर लक्ष केंद्रीत करावे. त्यांच्यासाठी निवास, फिरणे आणि जेवणाची उत्तम व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था उत्तम दर्जाची असावी. याठिकाणी स्वच्छता आणि निटनेटकेपणा असणे आवश्यक आहे. सेमाडोह आणि कोलकास येथे राहण्याची व्यवस्था तसेच याठिकाणांची देखभाल, दुरूस्ती सातत्याने करावी. इतर ठिकाणी टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येते. सुविधा आणि सवलती दिल्यास त्यांचा मेळघाटातील पर्यटनाकडे कल वाढू शकेल. यासाठी पर्यटनाचे क्षेत्र विस्तारण्याची गरज आहे. धबधबे, ऐतिहासिक वास्तू ही केंद्र ठरवून पर्यटकांना त्याठिकाणी पायी नेण्यासाठी मार्ग तयार करण्यात यावे. या वाटेत नाश्ता, जेवण आदी व्यवस्था झाल्यास पर्यटकांसाठी एक चांगली सुविधा निर्माण होऊ शकेल. वन विभागाने पर्यटकांना राहण्याच्या व्यवस्थेसोबतच जंगल भ्रमंतीसाठी रस्ता शोधावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी दिले.
पर्यटकांची मेळघाटला पसंती
चिखलदरा पर्यटनस्थळाप्रमाणेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट, सेमाडोह, शहानूर, नरनाळा, बोरी, धारगड, वसाली, सिपना गुगामल व अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या जंगल सफारीसह कोलकास येथील हत्ती सफारीला मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. चिखलदरा, नरनाळा, धारगड, बोरी येथे अनेक जिप्सी चालकांना आता रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे.

