चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मध्ये गुरुवार, २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात ८९ मचाणांवरून प्राणी गणना केली जाणार आहे. ‘निसर्ग अनुभव’ या गोंडस नावाने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. एका मचाणवर दोन निसर्गप्रेमींना साडेचार हजार रुपये शुल्क आकारून रात्रभर मुक्कामाची संधी दिली जाते. निसर्ग अनुभवासाठी निसर्गप्रेमींकडून या सर्व मचाणांची नोंदणी पूर्ण झालेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशाच्या लख्ख प्रकाशात प्राणीगणना केली जाते. यावर्षी प्रथमच ‘कोअर झोन’ वगळता ‘बफर’ क्षेत्रातील चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव व शिवणी या सहा परिक्षेत्रातील मचाणांवर प्राणीगणना अर्थात निसर्ग अनुभव हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील ८९ मचाणांवर प्रत्येकी दोन निसर्गप्रेमींना संधी देण्यात आली आहे. आठवडाभरापूर्वीच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने ‘माय ताडोबा’ या संकेतस्थळावर निसर्ग अनुभव उपक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. ८९ मचाणांवर प्रत्येकी दोन, अशा १७८ निसर्गप्रेमींनी यासाठी नोंदणी केली. यासाठी साडेचार हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. तसेच प्रत्येक मचाणवर दोन निसर्गप्रेमींसोबत एक मार्गदर्शक (गाईड) असेल.

हेही वाचा – …अन् ‘ते’ राजीव गांधी यांचे राज्यातील अखेरचे जेवण ठरले, स्मृतीस उजाळा!

बुद्ध पौर्णिमेला म्हणजेच गुरुवार २३ मे रोजी सायंकाळी चार वाजता प्रत्येक प्रवेशद्वारावर या निसर्गप्रेमींना बोलावण्यात आले आहे. तिथून या निसर्गप्रेमींना वाहनाद्वारे (जिप्सी) मचाणापर्यंत नेले जाईल. निसर्गप्रेमींना जेवण, पाणी, चादर आणि आवश्यक वस्तू सोबत आणावे लागणार आहे. एकदा मचाणावर चढल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळीच खाली उतरता येईल. त्यामुळे निसर्गप्रेमींना सर्व तयारीनिशी बोलावण्यात आले आहे. पान, खर्रा, विडी, तंबाखू, तसेच पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या सोबत आणण्यास मनाई आहे. या सर्वांकडून नोंदणी करतानाच त्यांचे ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रे घेण्यात आलेली आहेत. प्रगणना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी या सर्वांना संबंधित प्रवेशद्वारावर सोडण्यात येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही निसर्ग अनुभव घेण्यासाठी निसर्गप्रेमींमध्ये उत्साह दिसून येतो आहे. या सर्वांना ताडोबा प्रकल्पाच्यावतीने आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सर्व सूचनांचे पालन करावे, असे निर्देश आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या या निसर्ग अनुभव उपक्रमासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील सर्व मचाण दुरुस्ती करून सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, ताडोबा बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांच्या नेतृत्वात ताडोबाचे वनाधिकारी हा उपक्रम यशस्वी व्हावा, यासाठी परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा – नक्षलवाद्यांचा गड ‘अबुझमाड’ सुरक्षा यंत्रणांच्या ‘रडार’वर! पाच महिन्यांत १०७ नक्षल्यांचा खात्मा

वन्यप्राण्यांची नोंद

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, नीलगाय, अस्वल, कोल्हा, चितळ, सांबर, मोर, लांडोर यासोबतच इतरही वन्यप्राणी आहेत. या सर्व वन्यप्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींसोबत असलेल्या मार्गदर्शकाला मचाण प्रगणनेचा तक्ता दिला जाणार आहे. त्यात कोणत्या वेळी कोणते प्राणी दिसले, याची नोंद संबंधित तक्त्यात घ्यायची आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nature experience on buddha purnima in tadoba 178 nature lovers stay on 89 platforms rsj 74 ssb