अमरावती: विलासनगर आणि साईनगर प्रभागातून युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी गुरूवारी भाजपच्या व्यासपीठावरून विरोधकांना चांगलेच धारेवर धरले.

मी भाजपचा भगवा गळ्यात घातला असून पक्षाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहे. जे पक्षात राहून भाजपच्या उमेदवारांविरोधात काम करतील, त्यांना मी कदापि सोडणार नाही, अशा शब्दांत राणा यांनी विरोधकांना इशारा दिला. येथील दसरा मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

सभेला शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर आणि भाजपचे इतर नेते उपस्थित होते. काही दिवसांपुर्वी साईनगर येथे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यामुळे राणा यांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, त्यावर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून माझ्या निष्ठेबद्दल कुणीही शंका घेऊ नये. मात्र जे कमळासोबत नसतील, त्याच्या पाठीशी मी उभी राहणार नाही.

राणा यांचा हा रोख प्रामुख्याने साईनगरचे भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय यांनी राणा यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. आता साईनगरमध्ये भारतीय यांच्या विरोधात युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे रिंगणात असल्याने पेच निर्माण झाला आहे.

खोडके दाम्पत्यावर बोचरी टीका

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार सुलभा खोडके आणि संजय खोडके यांचे नाव न घेता त्यांच्यावरही राणांनी टीका केली. ज्यांना पुर्वी बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्याची भीती वाटत होती. त्यांना आज त्याच फोटोंचा आधार घ्यावा लागत आहे, असा टोला राणा यांनी लगावला. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचाच महापौर होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हिंदू मतांचे राजकारण

यावेळी बोलताना राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी हिंदू मतांच्या ध्रुवीकरणावर भाष्य केले. राष्ट्रवादी अजित पवार गट, एमआयएम आणि काँग्रेसने मुस्लीम महापौर करण्याचे संकेत दिले आहेत, तसे झाल्यास हिंदूंचा आवाज दाबला जाईल, त्यामुळे मतांचे विभाजन टाळून केवळ कमळाचा मतदान करा, असे आवाहन डॉ. अनिल बोंडे यांनी केले. सभेला भाजपचे सर्व उमेदवार आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.