अमरावती : माजी खासदार नवनीत राणा या जात आणि धर्मात भांडण लावून सत्तेची पोळी कशी शेकता येईल, यासाठी पाणी घालून जिवंत ठेवण्यात येणारी विषवल्ली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात बोलताना केली. त्यावर प्रत्युत्तर देताना ‘अशा चिल्लर लोकांच्या वक्तव्यांवर मला बोलण्याची गरज नाही, पण जेव्हा नाशिकमध्ये टीसीएस प्रकरण उघडकीस आले, तेव्हा वडेट्टीवार यांची जीभ का वळवळली नाही,’ असा सवाल नवनीत राणा यांनी केला.

काँग्रेसनेच विषारी साप पोसले

नवनीत राणा म्हणाल्या, काँग्रेसने हिरवे विषारी साप पोसून ठेवले आहेत, म्हणून एवढे वळवळ करतात. हे सर्व प्रकार आता कुठे उघडकीस येत आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळात या हिरव्या विषारी सापांना जपण्याचे काम आणि असे प्रकार दडपण्याचे काम काँग्रेसने केले होते. पण, आता ही सर्व प्रकरणे बाहेर निघत आहेत. आता या सर्व हिरव्या सापांना ठेचण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत. यांना आम्ही सोडणार नाही. पण, हे जे चिल्लर लोक बोलताहेत, त्यांनी आधी आपल्या घरात पाहिले पाहिजे.

महिला आरक्षण विधेयकावरून..

नवनीत राणा म्हणाल्या, महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून काँग्रेसने आपली मानसिकता दाखवून दिली आहे. यांना महिलांचा किती सन्मान आहे, हे संपूर्ण देशाने, जगाने पाहिले आहे. वास्तविक महिलांना पाठिंबा देण्याची गरज असताना त्यांनी कसा पळ काढला, हे सर्वांना समजले आहे. त्यामुळे या चिल्लर लोकांनी आम्ही काय केले पाहिजे, हे सांगू नये. हिरव्या विषारी सापांना ठेचण्याचे काम आम्ही करणारच. महिलांविषयी बोलण्याच्या आधी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या घरातही पाहिले पाहिजे. त्यांच्या घरी सुद्धा मुली आहेत.

वडेट्टीवार काय म्हणाले होते?

परतवाडा येथील प्रकरणात बुरख्यावाल्या नव्हत्या, असे नवनीत राणा कोणत्या आधारावर बोलल्या. तोंडात आले की काहीपण वाफा काढायच्या का? या बाईची जीभ जातीयवादी आणि धर्मांध बनली आहे. लोकांनी निवडणुकीत पाडून जिरवली तरी अजून शुद्धीवर यायला तयार नाही. राणा यांना हनुमान चालीसाच्या दोन ओळी बोलता येत नाही. त्या हिंदू धर्माच्या गोष्टी बोलत आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली होती. खरात प्रकरणावर ब्र न काढणाऱ्या नवनीत राणा मुस्लिम तरुण दिसल्याबरोबर बावचाळल्यासारखी बोलतात, असेही ते म्हणाले होते.