लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : सनातन बोर्डाची सध्‍या तरी आवश्‍यकता नाही, असे वक्‍तव्‍य मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले असताना भाजपच्‍या नेत्‍या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी मात्र वक्‍फ बोर्ड बंद करून सनातन बोर्ड स्‍थापन करण्‍याची मागणी केली आहे. आपण यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्‍याकडे मागणी करणार असल्‍याचे राणा यांनी म्‍हटले आहे. यावरून येत्‍या काळात राजकारण रंगण्‍याची चिन्‍हे आहेत.

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, राज्यात लव्ह जिहाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या कायद्याचा खूप मोठा फायदा होईल. या प्रकरणी आजवर अनेक समित्या काम करत होत्या. या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या अनेक मुलींना आम्ही परत आणले आहे. महाविकास आघाडीच्या काळात आरोपींना सहकार्य मिळत होते. त्यामुळे यासंबंधीचा कायदा आला तर मुलींची कोणतीही फसवणूक होणार नाही.

नवनीत राणा यांनी यावेळी वक्फ बोर्ड रद्द करून त्याच्या जागी सनातन बोर्ड स्थापन करण्याचीही मागणी केली. वक्फ बोर्डाने कोट्यवधी रुपयांच्‍या जमिनी लाटल्या आहेत. त्यामुळे वक्फ बोर्ड रद्द करून त्याच्या जागी सनातन बोर्डाची स्थापना करण्‍यात यावी. हे बोर्ड भाजपचे सरकार अस्तित्वात असतानाच झाले पाहिजे. मी स्वतः या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे, असे राणा म्हणाल्या.

फडणीस काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सध्या तरी सनातन बोर्ड स्थापन करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. फडणवीस म्हणाले होते की, सनातन बोर्डाची सध्या तरी आवश्यकता आहे, असे वाटत नाही. कारण आपली संस्कृती सनातन आहे. सनातनचा अर्थ जी नूतन आहे आणि पुण्यपुरातन आहे. या सगळ्या गोष्टीची व्याख्या अतिशय संकुचित अशी घेतली जाते. मुळात हे सगळे शब्द प्राचीन जीवन पद्धतीला अनुसरून आले आहेत. हा कुठलाही शब्द पूजा पद्धतीशी संबंधित नाही. आमच्या संस्कृतीने एक भारतीय जीवन पद्धती तयार केलेली आहे. ज्या जीवन पद्धतीला हिंदू असे म्हटले आहे.

आता तरी वक्फ बोर्ड आहे, म्हणून सनातन बोर्ड स्थापन करण्याची आवश्यकता नाही, असे फडणवीस यांनी जाहीर केल्‍यानंतरही नवनीत राणा यांचे हे वक्तव्य आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana demands closure of waqf board and establishment of sanatan board mma 73 mrj