नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी १९ हजार ७३१ मतांनी त्यांचा पराभव केला. मात्र, त्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांसमोर येणं टाळलं होते. दरम्यान, या पराभवानंतर आता त्यांनी पहिल्यांच माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीला गेलेल्या नवनीत राणा या नुकत्याच महाराष्ट्रात परतल्या. त्यानंतर नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी लोकसभेतील पराभवावर पहिल्यांदाच भाष्य केलं. अमरावतीकरांनी मला का थांबवलं, याचा विचार मी करत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “नवनीत राणा पराभूत झाल्‍याचा महाराष्‍ट्राला आनंद” बच्‍चू कडू यांनी भाजपला डिवचले

नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा?

“दिल्लीत मी गेल्या पाच वर्षांपासून काम करत आहे. दिल्लीत जाणं माझ्यासाठी नवीन नाही. यापुढेही दिल्लीत येणं-जाणं सुरु राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असला, तरी मनात कुठंतरी विजयाची भावना आहे, कारण नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. भाजपाची एक कार्यकर्ता म्हणून मी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर होती”, असं नवनीत राणा म्हणाल्या.

“अमरावतीकरांनी मला का थांबवलं, समजलं नाही”

“पाच वर्षांपूर्वी जनतेने अमरावतीचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी मला दिल्लीत पाठवलं होतं. मात्र, यंदा मला त्यांनी का थांबवलं, हे मला अजूनही समजलेलं नाही. पण हा पराभव म्हणजे शेवट नाही, गेल्या पाच वर्षांत मी प्रमाणिकपणे काम केलं आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी बच्चू कडू यांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला. “काही लोक मैदान जिंकण्यासाठी निवडणूक लढवतात, तर काही लोक, दुसऱ्यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करतात”, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा – बच्चू कडूंनी सांगितलं नवनीत राणांच्या पराभवाचं कारण, म्हणाले, “त्यांनी जर..”

लोकसभेत नवनीत राणांचा झाला होता पराभव

दरम्यान, यंदा अत्‍यंत चुरशीच्‍या झालेल्या लढतीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी भाजपच्‍या नवनीत राणा यांचा १९ हजार ७३१ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत वानखडे यांना ५ लाख २६ हजार २७१ मते मिळाली होती, तर नवनीत राणा यांना ५ लाख ६ हजार ५४० मते प्राप्‍त झाली होती. याशिवाय प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना ८५ हजार ३०० मते मिळाली. तर रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांनाही मतदारांनी नाकारले. त्‍यांना केवळ १८ हजार ७९३ मते प्राप्‍त झाली. या निवडणुकीत एकूण ३७ उमेदवार रिंगणात होते. त्‍यातील अनेक उमेदवार तीन अंकी आकडा देखील ओलांडू शकले नव्हते.