नागपूर : परतवाडा आणि अचलपूर भागातील अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या कथित मोठ्या रॅकेटमध्ये सामील असलेल्या आरोपींचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी भाजप नेते नवनीत राणा यांनी बुधवारी केली. यावरून आता अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नवनीत राणा यांचा समाचार घेतला आहे.

नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत प्यारे खान म्हणाले की, नवनीत राणा यांच्यावर पोस्को अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी माझ्याकडे आली. नवनीत राणा यांना दंगली घडवायच्या आहेत, त्यामुळे ते हे सगळे करत असल्याचा खळबळजनक आरोपही खान यांनी केला.

अफवा पसरवणाऱ्या नेत्यांवरही कारवाई

काल एक पथक आम्ही परतवाडा येथे पाठविले होती. अमरावतीचे पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी माहिती दिली. राजकीय नेत्यांनी या घटनेनंतर अनेक अफवा पसरवल्या. अमरावतीचे पोलिस आयुक्त राकेश ओला यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. अफवा पसरणारे नेते कितीही मोठे असले तरी त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असेही खान म्हणाले.

नवनीत राणा यांना पक्षातून काढण्यासाठी मोदींना पत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महाराष्ट्र आहे. विकास थांबवण्यासाठी जे लोक प्रयत्न करतील त्यांच्यावर कारवाई होईल. नवनीत राणा या अमरावती येथे असतांना त्यांना ही माहिती कशी काय कळली नाही. नवनीत राणा यांच्यावर पोस्को अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी माझ्याकडे आली. नवनीत राणा यांना दंगली घडवायच्या आहे. मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून नवनीत राणा यांना पक्षातून बाहेर काढा अशी मागणी करत आहे.

नेमकी घटना काय?

परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही मुलींचे आणि एका तरूणाचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी अयान अहमद याने विविध मुलींशी ओळख वाढवून त्यांच्या इच्छेविरूद्ध अश्लील चित्रीकरण केले आणि ते फोटो-व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात धर्माचा कोणताही रंग नाही.पोलिस या प्रकरणात योग्य तपास करत आहेत. आरोपी सोबत जर फोटो काढल असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. आरोपीचा बहिष्कार करण्याचे मुस्लीम समाजाने ठरवले आहे, असेही प्यारे खान यांनी सांगितले.