अमरावती: अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. अशोक खरातला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची एसआयटीमार्फत चौकशी सुरू असून दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. समाज माध्यमांवर अनेक व्हिडिओ प्रसारीत होत आहेत. त्यामुळे वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रथमच या प्रकरणी भाष्य करताना भोंदूबाबा अशोक खरात याला भर चौकात फाशी दिली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नवनीत राणा काय म्हणाल्या?
येथील भानखेडा मार्गावरील हनुमान गढी येथे उभारण्यात आलेल्या १११ फूट उंच हनुमान मूर्तीचे नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज पूजन केले. त्यांनी यावेळी हनुमान चालिसाचेही पठन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, नाशिकमधील प्रकार हा अनेकांची मने दुखावणारा आहे. आम्ही भक्तिभावाने देवाची पूजा-अर्चना करतो, पण यात जर कुणी भोंदूबाबा त्याचा गैरफायदा घेत असेल, तर ते संतापजनक आहे. या प्रकरणात जे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारीत केले जात आहेत, त्यातून महिलांचे चारित्र्य हनन केले जात आहे, हे दुर्देवी आहे. मला तर असे म्हणायचे आहे, की भोंदूबाबा अशोक खरात याला भरचौकात फाशी द्यायला हवी, यापेक्षा कमी शिक्षा नको. या बलात्कारी व्यक्तीला अशी शिक्षा व्हायला हवी, की जे कुणी स्वयंघोषित भोंदूबाबा आहेत, त्यांच्यावर वचक बसली पाहिजे. या भोंदूबाबाला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे.
उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा टीका
नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रावरच दुर्लक्ष होते, विदर्भात तर त्यांनी फिरकूनही पाहिले नाही. त्यांनी देखील हनुमान गढी येथे येऊन हनुमान चालिसाचे पठन केले पाहिजे. हनुमानजींचा अपमान केल्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात मोठी संकटे आली आहेत. हनुमान चालिसाचे पठन केल्यास संकटे दूर होण्याची संधी आहे. देवाच्या घरी कुणी मोठा आणि कुणी छोटा नसतो. हनुमान गढी येण्यासाठी आम्ही निमंत्रण देण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे यांनी देवाच्या ठिकाणी स्वत:हून आले पाहिजे.
