अमरावती: दुबईहून इस्त्रायलकडे जाणाऱ्या विमानात १७५ प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मीत मच्छार यांच्या शौर्याची आणि प्रसंगावधानाची दखल घेत भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. प्राणघातक हल्ल्याच्या आणि अत्यंत कठीण प्रसंगात कॅप्टन स्मीत यांनी हनुमान चालिसाचे पठण करत धैर्य टिकवून ठेवले, ही बाब देशभरातील नागरिकांसाठी आणि हनुमान भक्तांसाठी अत्यंत अभिमानास्पद तसेच प्रेरणादायी असल्याचे राणा यांनी म्हटले आहे.

मानवतेच्या नात्यातून केलेले कार्य

नवनीत राणा यांनी समाज माध्यमांवर एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, दुबई ते इस्त्रायल जाणाऱ्या विमानात सहवैमानिकाकडून झालेल्या हल्ल्यामुळे १७५ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र स्वत: गंभीर जखमी असतानाही कॅप्टन स्मीत यांनी अत्यंत धाडसाने परिस्थिती हाताळली. कट उधळून लावत सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले. प्रवाशांमध्ये बहुतांश लोक इस्त्रायलचे नागरिक होते. कॅप्टन स्मीत यांनी आपल्या देशाचे नागरिक कोण आणि परदेशी कोण असा कोणताही भेदभाव न करता मानवतेच्या नात्याने सर्वांचे प्राण वाचवले.

पंतप्रधानांकडूनही दखल

रुग्णालयात उपचार घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कॅप्टन स्मीत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. संकटाच्या क्षणी संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले, असा उल्लेखही राणा यांनी केला.

हनुमान चालिसाने दिले आत्मबळ

कॅप्टन स्मीत यांनी एका मुलाखतीत नमूद केले की, तेव्हा त्यांच्यावर आघात होत होते आणि ते प्रचंड वेदनेत होते, तेव्हा त्यांनी हनुमान चालिसाचे पठण करून स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खंबीर ठेवले. यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, ‘संकट कटै मिटै सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा’ ही चौपाई अशा क्षणी प्रत्यक्षात सिद्ध होते. संकटात सापडलेल्या प्रत्येक भक्ताला या श्रद्धेमुळे लढण्याचे अफाट बळ मिळते. कॅप्टन स्मीत यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल देशवासीयांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करते’, असे म्हणत राणा यांनी जय हिंदसह शुभेच्छा दिल्या.

नेमकी घटना काय होती?

इस्त्रायलच्या तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात सहवैमानिकाने कॅप्टन स्मीत यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. या झटापटीत कॅप्टन स्मीत हे गंभीर जखमी झाले होते.