अमरावती : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. ज्यांनी माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय ना, असा युक्तिवादही अजित पवारांनी केला. या विधानाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनीही त्यावर भाष्य केले आहे. कुणीही बोलताना मर्यादा ओलांडू नये, असा सल्ला नवनीत राणांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज टीका केली, त्यानंतर काही तासांतच माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही टिप्पणी केली. चव्हाण म्हणाले होते की, अजित पवारांनी आरोप करण्यापूर्वी प्रथम आत्मपरीक्षण करावे.
नवनीत राणा म्हणाल्या, अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. महायुती मिळून हे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे कुठलेही वक्तव्य करताना मर्यादा ओलांडू नये.
अजित पवारांनी केली होती टीका
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार यांनी काल पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सिंचन घोटाळ्याचा विषय काढला होता. ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा दाखला अजित पवारांनी दिला. ज्यांनी ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याच सोबत आज मी सत्तेत बसलो ना, असा सवाल अजित पवारांनी केला होता. हा प्रश्न विचारुन उपमुख्यमंत्र्यांनी थेट भाजपची कोंडी केली होती.
अजित पवारांच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिले आहे. आम्ही आरोप करायला गेलो, तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील. याची काळजी त्यांनी घ्यायला हवी, असे रविंद्र चव्हाण म्हणाले. आरोप-प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. अजित पवारांनी आधी स्वत:कडे पाहावे आणि ते मोदी, फडणवीसांच्या पक्षाविषयी बोलत आहेत, हे लक्षात ठेवावे, असा सूचक इशारा चव्हाण यांनी दिला.
रविंद्र चव्हाणांनी केला सवाल
अजित पवार हे भाजपसोबत कशा पद्धतीने जोडले गेले, हे सर्वांना माहिती आहे. त्यांना सोबत घेण्याबाबत पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे पदाधिकारी मला थोडा विचार करा, म्हणून सांगत होते. पवार यांना सोबत घेत असल्याचा पश्चाताप होत असल्याचे विधान रविंद्र चव्हाण यांनी केले. आता या दोन नेत्यांमध्ये वाक् युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत.
