अमरावती: येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर टीका केली होती. स्त्री रुग्णालयाला देण्यासाठी सरकारकडे नऊ कोटींचा निधी नाही, मात्र भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्या हनुमान गढीसाठी १२१ कोटी रुपये मंजूर केले जातात, असा टोला त्यांनी लगावला होता. नवनीत राणा यांनी आता त्यावर प्रत्युत्तर दिले आहे.
आस्थेवर, धर्मावर टीका करू नका
एका कार्यक्रमात बोलताना नवनीत राणा यांनी विरोधकांना इशारा दिला. त्या म्हणाल्या, नवनीत राणा यांचे नाव घेतले नाही, तर आपण टिव्हीवर दिसणार नाही, असे अनेक नेत्यांना वाटते, त्यामुळे ते आपले नाव घेत असतात. हनुमान गढीसाठी १२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, तो अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत व्यवस्थितपणे विरोधकांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. आमच्या आस्थेवर, धर्मावर, देवीदेवतांवर कुणी टीका करू नये. सरकारजवळ लाखो, कोट्यवधी रुपये आहेत. आम्ही आमच्या संस्कृतीसाठी, धर्मासाठी आम्ही समोर येत नसू, तर कुणी पाकिस्तानातून येऊन आमच्या धर्माचा प्रचार, प्रसार करणार नाही.
आता फक्त भगवाच फडकणार
नवनीत राणा म्हणाल्या, २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतर शहरात पिवळी माती उधळून जल्लोष करण्यात आला होता. पण, आता यापुढे पिवळी माती दिसणार नाही. या ठिकाणी केवळ भगवाच फडकत राहणार आहे. कुणी आमच्या धर्मावर, संस्कृतीकडे बोट दाखवू नये, ते तोडण्याची क्षमता आमच्या लोकांमध्ये आहे.
दहीहंडी कार्यक्रम रद्द
आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे शहरातील नवाथे चौकात दरवर्षी दहीहंडी कार्यक्रम साजरा केला जातो. यंदा त्याची तयारी झाली होती. पण, स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करावा, अशी विनंती नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाकडे केली होती. त्यानुसार नवाथे चौकासह परतवाडा, धारणी, अंजनगाव सुर्जी व तिवसा येथील सर्व दहीहंडी कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा आमदार रवी राणा यांनी केली आहे. ६ सप्टेंबर रोजी नवाथे चौक येथे दहीहंडीची परंपरा कायम ठेवत साध्या पध्दतीने बाळगोपालांच्याहस्ते भगवान श्रीकृष्ण यांचे पूजन करुन दहिहांडी फोडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
